ठाणे : महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात महिनाभरापूर्वी प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी स्वच्छतेसाठी वापरलेले कापड त्या महिलेच्या पोटात तसेच राहिल्याचा आरोप तिच्या आप्तांनी केला आहे.

या महिलेला प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार  मात्र दाखल करण्यात आलेली नाही.

२९ एप्रिल रोजी तिची नैसर्गिक प्रसुती झाली.  त्यादरम्यान बाळाचे डोके आत अडकल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया केली होती.

गेल्या काही दिवसांपासून शस्त्रक्रिया झालेल्या ठिकाणी प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यामुळे  खासगी रुग्णालयात तिने तपासणी केली असता हे कापड आत राहिल्याचा प्रकार उघड झाला. या महिलेला कळवा रुग्णालयात नेऊन तिथे उपचारासाठी दाखल केले आहे, अशी माहिती मनसेच्या महिला पदाधिकारी समीक्षा मरकडे यांनी दिली.

या संदर्भात सविस्तर चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी ग्वाही रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संध्या खडसे यांनी दिली आहे.