ठाण्यातील महोत्सवात श्वान दत्तक घेण्यासाठी ५० जण उत्सुक

एकाच मंचावर वेगवेगळ्या प्रजातीच्या श्वानांनी रंगीबेरंगी झबले आणि जीन्सचे कपडे परिधान करून रॅम्पवॉकवर रुबाब दाखवल्याने रविवारची सायंकाळ अनेकांसाठी खास ठरली. सोहळ्यात मोठय़ा डौलाने बागडणाऱ्या ‘इमानी मित्रा’ला दत्तक घेण्यासाठी सुमारे ५० श्वानप्रेमींनी नोंदणी केली.

विवियाना मॉल, लिव्हिंग ड्रीम्स इव्हेंट आणि पेट ओनर्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल लवर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘द पॉसम शो’ या श्वान सोहळ्यात देशी श्वान जातींसोबतच वेगवेगळ्या परदेशी श्वानही नटूनथटून हजर होते. ५० कुटुंबीयांनी श्वान दत्तक घेण्यासाठी महोत्सवात नोंदणी केली.

पाळीव प्राण्यांच्या पालनाविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी आणि एकाच व्यासपीठावर श्वानांची दत्तक योजना पार पाडण्यासाठी या ‘द पॉसम शो’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात श्वानांसाठी ‘ग्रुमिंग’ आणि खाद्यपदार्थ मोफत ठेवण्यात आले होते. देशी श्वानांसोबतच पग, लॅब्रेडोर, जर्मन शेफर्ड, शित्झू अशा वेगवेगळ्या जातींचे श्वान, देशी जातीच्या मांजरी, पर्शियन जातीची मांजरे या दत्तक सोहळ्यात होती.

या सोहळ्यात २००हून अधिक श्वानप्रेमींनी श्वानांना घेऊन हजेरी लावली होती. ‘पेट ओनर्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल लवर्स’ या संस्थेतर्फे काही श्वान आणि मांजर दत्तक योजनेसाठी ठेवण्यात आले होते.

‘पेट ओनर्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल लवर्स’ या संस्थेतर्फे एखाद्या कुटुंबीयाकडे श्वानाची जबाबदारी सोपवण्यापूर्वी संबंधित श्वानमालकाची संपूर्ण पडताळणी करण्यात येणार आहे. दत्तक योजनेमुळे संस्थेला रस्त्यावर सापडलेल्या देशी तसेच परदेशी जातीच्या श्वानांना हक्काचे घर मिळणार आहे. ‘द पॉसम शो’ या श्वानांच्या सोहळ्यात त्यांचा रॅम्पवॉक आकर्षण ठरला होता. गुलाबी रंगाचे झबले परिधान करून, डोक्यावर मुकुट आणि शेपटीला ‘बो’ बांधून रॅम्पवॉकवर उतरलेले काही लॅब्रेडोर आणि शित्झू श्वान सोहळ्याचे आकर्षण ठरले.

कमी पावसाचा परिणाम

ठाणे शहरातील वितरित होणाऱ्या आणि साठवणूक केलेल्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता घसरण्यामागचे निष्कर्ष पर्यावरण अहवालात नमूद करण्यात आले आहेत. २०१५-१६ या कालावधीत कमी पाऊस झाल्यामुळे एप्रिल ते जुलै २०१६ या कालावधीत कमी प्रमाणात पाणी वितरित होत होते. त्यामुळे या चार महिन्यात पाण्याची गुणवत्ता खालावल्यामुळे वार्षिक गुणवत्ता कमी झालेली असल्याचे अहवालात म्हटले आहे.