छत्रीची तार तुटली आहे, नळ गळतोय, विजेचे बटण बदलायचेय, कार धुवायची आहे.. अशा ‘किडुकमिडुक’ दुरुस्त्यांना दैनंदिन आयुष्यात वेळोवेळी तोंड द्यावे लागते. अगदी घराच्या भिंतीला छोटासा खिळा ठोकायचा म्हटले तरी पटकन सुतार मिळत नाही. अशा वेळी आठवडय़ाच्या सुट्टीचा एकमेव दिवस या कामांतच खर्च होऊन जातो. ही समस्या लक्षात घेऊन मुंबई-ठाण्यातील बडय़ा वसाहतींमध्ये आता ‘सेवा बाजार’सारखी नवी कल्पना रूढ होऊ लागली आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरातील अनेक गृहसंकुलांमध्ये भरणाऱ्या या ‘सेवा बाजारा’त एकाच ठिकाणी वेगवेगळी कामे करणारे कारागीर आणि कामगार पुरवले जात आहेत.
घरातील लहानसहान दुरुस्ती कामे करण्यासाठी किंवा घरगुती उपकरणांची वार्षिक देखभाल करण्यासाठी पटकन कारागीर मिळत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन आता काही कंपन्या ही दुरुस्ती कामे करण्याच्या क्षेत्रात उतरली आहेत. ग्राहकाची वेगवेगळी कामे पार पाडण्यासाठी कामगार उपलब्ध करून देण्याचे काम या कंपन्या सध्या बाजारात पुढे येत आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून गृहसंकुले किंवा वसाहतींमध्ये ‘सेवा बाजार’ चालवण्याची संकल्पना पुढे येत आहेत. ठाण्यातील लोढा पॅरेडाइज या वसाहतीत १५ ऑगस्ट रोजी अशाच एका सेवेचा शुभारंभ होत आहे. या संकुलात पुढील पंधरा दिवसांतून एकदा वेगवेगळ्या वसाहतींमधील हे बाजार भरविले जाणार आहे.
‘सेवा बाजार’ कसा असेल?
अ‍ॅस्पायर फॅसिलेटर्स ही संस्था या भागातील वेगवेगळ्या कारागिरांना एकत्र आणून त्यांना एखाद्या गृहसंकुलाच्या आवारामध्ये सेवा बाजार भरवील. लाकडी सामान दुरुस्तीसाठी सुतार, चप्पल शिवणारा चर्मकार, सायकल दुरुस्ती करणारा, विद्युत वस्तू दुरुस्त करणारा, पीयूसी गाडी, गॅस स्टोव्ह दुरुस्ती करणारा, स्वच्छतागृह सफाई करणारे, खेळाचे साहित्य दुरुस्त करणारा, संगणक लॅपटॉप दुरुस्त करणारे, सुऱ्यांना धार काढणारे, नळ दुरुस्ती करणारे, कीटकनाशक, कारसफाई, चष्मा दुरुस्ती अशा सगळ्याच प्रकारची दुरुस्ती करणारे कारागीर सेवा बाजारच्या निमित्ताने गृहसंकुलधारकांना एकाच ठिकाणी मिळू शकणार आहेत.
ठाणे शहराची केंद्राच्या स्मार्ट शहर योजनेमध्ये सहभाग झाला असून शहरे स्मार्ट बनण्यासाठी गृहसंकुलेदेखील स्मार्ट होण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी काम करीत असताना सेवा बाजार या सामाजिक उपक्रमाची निर्मिती करण्याचे आमच्या संस्थेने ठरवले. ठाणे शहरातील अनेक गृहसंकुलांनी त्याला होकार कळवल्याने आता ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात येईल.
-कल्याण राव, अ‍ॅस्पायर फॅसिलेटर्स