किरकोळ बाजारात सुके खोबरे २८० ते ३०० रुपये, तर कांदा २५ ते ३० रुपये किलो

किशोर कोकणे- पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांकडून किराणा मालाची साठवणूक करण्यात येत असल्याने त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रकार किरकोळ विक्रे त्यांकडून वाढीस लागला आहे. किरकोळ बाजारात सुके खोबरे आणि कांद्याच्या दरात दुपटीने वाढ करण्यात आली असून डाळींपाठोपाठ उत्तम प्रतीचा कांदा ३० रुपयांनी, तर सुके खोबरे २८० ते ३०० रुपये किलो या दराने विकले जात आहे. विशेष म्हणजे, वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे उच्चतम दर १२ रुपये असून खोबरेही २०० रुपयांच्या आसपास विकले जात आहे. असे असताना किरकोळ बाजारातील ही लूट ग्राहकांच्या संतापात भर टाकू लागली आहे.

देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तसेच भाजीपाला आणि धान्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांनी नागरिकांची लूट करू नये, असे आदेशही राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर ठाण्यात विविध दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुपटीने विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. भाजी, धान्यविक्रीच्या लुटीनंतर किरकोळ बाजारात आता कांदा आणि सुके खोबरे ग्राहकांना दुप्पट दराने विक्री सुरू आहे. टाळेबंदीनंतर छोटे-मोठे उपाहारगृह तसेच बटाटावडा विक्रीच्या हातगाडय़ा बंद झाल्याने कांद्याची मागणी कमी झालेली आहे, तर आवक वाढलेली आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ाभरापासून एपीएमसी बाजारात कमीत कमी ६ आणि जास्तीत जास्त १२ रुपये इतक्या दराने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांद्याचे दर कमी व्हायला हवे होते. मात्र, ठाण्यातील अनेक किरकोळ बाजारांत कांदे २५ ते ३० रुपये किलोने विक्री केले जात आहे. सुके खोबरेही किरकोळ बाजारात चढीच्या दराने विकले जात आहे. एपीएमसीमध्ये १६० ते २०० रुपये किलोने

विक्री होणारे खोबरे किरकोळ बाजारात मात्र, २८० ते ३०० रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली किरकोळीत लूट सुरूच असल्याचे चित्र कायम आहे.

किरकोळ बाजारात दरांत वाढ

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची सुमारे ५० टक्के आवक वाढली आहे. मागील आठवडय़ात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या २० गाडय़ा दाखल होत होत्या, तर या आठवडय़ात कांद्याच्या ४५ गाडय़ा दाखल झाल्या आहेत, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदेबटाटा बाजारातील अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या आठवडय़ाभरापासून घाऊक बाजारात कांद्याचे दर हे कमी झाले आहेत. पूर्वी १५ ते १८ रुपये किलोने विकला जाणारा कांदा सध्या ६ ते १२ रुपये किलोने विकला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. एपीएमसीत सुक्या खोबऱ्याची आवक १७० ते २०० क्विंटल होत असून त्याची विक्री १४० ते २०० रुपये किलोने केली जात असल्याची माहिती मसाला बाजारातील अधिकाऱ्यांनी दिली. खोबऱ्याची आवक पुरेशा प्रमाणात होत असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

गृहिणींसमोर प्रश्न

किरकोळ बाजारात सुरू असलेल्या या लुटीमुळे गृहिणींसमोर स्वयंपाक नक्की काय करायचा, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. लोकमान्य नगर येथे राहणाऱ्या दीक्षा कदम वाटण घालून भाजी बनवतात. भाज्यांप्रमाणे कांदे आणि खोबरेच्या किमतीतही वाढ झाल्याने स्वयंपाक करायचा तरी कसा, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा झाला असल्याचे त्यांनी सांगितले, तर वर्तकनगरमधील आरती पाटील यांनीही बाजारात जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री होत असल्याने आर्थिक गणिते कोलमडल्याचे सांगितले.