पोलीस आले की, आरोपींची पळापळ सुरू होते आणि जिथे वाट मिळेल तिथे पळत सुटतात. शुक्रवारी सकाळी विरार जवळच्या अर्नाळा येथे बंदीच्या नियमांचं उल्लंघन करून क्रिकेट खेळणा-या तरुणांवर पोलीस करावाई करायला गेले मात्र हे तरुण चक्क समुद्रात पळाले आणि तिथेच जाऊन लपले. समुद्रात पोहत जाणाऱ्या या मुलांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

विरार जवळील अर्नाळा गाव हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या गावात १४८ रुग्ण आढळले असून ४ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे हे संपूर्ण गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे आणि सर्व व्यवहारांना बंदी घातली आहे. तरी शुक्रवारी सकाळी समुद्रकिना-यावर काही तरुण मुले बंदी आदेशाचे उल्लंघन करून क्रिकेट खेळत होती.

पोलिसांना त्याची माहिती मिळताच एक पथक कारवाई करण्यासाठी गेले. पोलीस आल्याचे पाहताच मुले घाबरली आणि सर्वांनी थेट समुद्रात धूम ठोकली. बहुतांश मुले ही मच्छिमारांची असल्याने पोहण्यात तरबेज आहेत. त्यामुळे त्यांनी पोहून समुद्रातील बोटी गाठल्या. पोलिसांना हात चोळत बसल्याशिवाय काही करता आले नाही. मुलांची पळापळ झाल्याची ही चित्रफित सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ :-


दरम्यान, आम्ही ४ ते ५ जणांना ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे जे समुद्रात लपून बसले त्यांनाही सहज शोधून काढू असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले. या प्रकरणी किमान २५ तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.