नया नगर परिसरातील प्रकारामुळे नागरिक त्रस्त

भाईंदर : मीरा रोड येथील नया नगर परिसरात रस्त्याच्या कामांदरम्यान सुरक्षा आवरण म्हणून चक्क कचऱ्याच्या डब्याचा वापर करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अरुंद रस्त्यात डबा रस्त्याच्या मध्यभागी ठेवण्यात आल्यामुळे  नागरिकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मीरा रोडच्या नया नगर येथील नागोरी चायसमोर सहा दिवसापूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले होते. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या कामात केवळ खड्डे पॅचवर्कच्या साहाय्याने बुजवण्यात आले. परंतु हे काम पावसात झाल्यामुळे त्या भागातील ओलावा कायम आहे .त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांनी कामाची अवस्था खराब होऊ नये म्हणून प्रशासनाकडून डब्याचे सुरक्षा आवरण ठेवण्यात आले आहे. परंतु अरुंद आणि रहदारीच्या मार्गावर सुरक्षा जाळ्याऐवजी कचऱ्याचा डबा ठेवल्यामुळे प्रवाशांना अनेक प्रश्न पडत आहे.

पालिका प्रशासन लाखो रुपये खर्च करून शहरातील विकासकामे करत करते. परंतु तयार होणाऱ्या या विकासकामांना योग्य सामुग्रीदेखील वापरण्यात येत नसल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शिवाय कचऱ्याचे डबे रस्त्याच्या मध्यभागी ठेवण्यात येत असल्यामुळे शहराच्या स्वच्छतेचा आणि सुंदरतेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. या संदर्भात कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांना फोन केला असता त्यांनी फोन उचला नाही.

मीरा-भाईंदर शहरात कचऱ्याच्या डब्यांचा वापर कचरा उचलण्याशिवाय अशाच कामांकरता अधिक होतो. आता आम्हाला हे पाहण्याची खरे तर सवय झाली आहे.

– राज पाटील, प्रवासी