शहरातील नागरी विकासाच्या कामांना करदात्या जनतेचा पैसा लागलेला असतो. ही विकास कामे पूर्ण करून ती जनतेच्या हितासाठी वापरणे यास आपण प्रथम प्राधान्य देणार आहोत. अधिकारांचे विकेंद्रीकरण करून शहरातील विविध प्रकारची विकास कामे मार्गी लावण्यात येतील आणि कल्याण डोंबिवली एक आदर्शवत शहर बनवण्याचा आपला प्रयत्न असेल, असा दावा कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त ई. रवींद्रन यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. रवींद्रन हे पालिकेतील २१ वे आयुक्त आहेत.
ई. रवींद्रन यांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयात आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मावळते आयुक्त मधुकर अर्दड, अतिरिक्त संजय घरत उपस्थित होते. कायदेशीर चौकटीत, नियमानुसार आणि पारदर्शी काम करण्यावर आपला नेहमीच भर असतो. प्रशासन चालवण्याची ती आपली पद्धत आहे. यापूर्वी अकोला, सिंधुदुर्ग येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी असताना आपण हीच कार्यपद्धती वापरली आहे. तीच पद्धत आपण कल्याण डोंबिवली महापालिकेत अवलंबणार आहोत. विकास कामे झटपट मार्गी लागण्यासाठी विकेंद्रीकरणावर आपला भर असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विकासाची रखडलेली कामे, २७ गावांचा प्रश्न, घनकचऱ्याचा प्रश्न, येणारी पालिका निवडणूक या सर्व व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्यात येईल. नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार नागरी सुविधा देणे यावर आपला भर असेल, असे रवींद्रन यांनी सांगितले.