|| नितीन बोंबाडे

एनडीआरएफ, नागरी संरक्षण दलाच्या ४६ जवानांवर २३ ग्रामपंचायतींचा भार

डहाणू आणि तलासरी तालुक्यांत गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाचे आजवर ७० धक्के बसले असून त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. मात्र भूकंपग्रस्त भागात प्रशासनाची अपुरी यंत्रणा असल्याचे दिसून येत आहे. डहाणू, तलासरी तालुक्यांतील २३ ग्रामपंचायतींमधील लाखो रहिवाशांच्या सुरक्षेची भिस्त एनडीआरएफच्या ३१ आणि नागरी संरक्षण दलाच्या १५ अशा ४६ जवानांवर आहे. २०० ठिकाणी तंबू उभारण्यात आले असले तरी ते अपुरे असल्याचे येथील रहिवशांनी सांगितले.

भूकंप भागात प्रशासनाने एका पाडय़ासाठी एक तंबू उभारला. अत्यंत लहान आकाराच्या या तंबूमध्ये दहा ते बारा लोक राहू शकत असल्याने जनतेत नाराजी व्यक्त केली. भूकंपामुळे डहाणू तालुक्यातील १५ ग्रामपंचायती आणि तलासरीतील आठ ग्रामपंचायती भूकंपामुळे बाधित आहेत. त्या भागाचा भौगोलिक विस्तार आणि दुर्गम भागात वसलेले आदिवासी पाडे लक्षात घेता २०० तंबू, ८ यंत्रे, ५०० ताडपत्री, बांबूंचे १५ तंबू अपुरे आहेत, असे येथील रहिवाशांनी सांगितले. भूकंपाच्या भीतीने लोकांचा          रोजगार बुडाला, मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाले. घरांना तडे गेले. त्यामुळे शासनाने भूकंपग्रस्तांना मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.

विशेष म्हणजे डहाणू आणि तलासरी तालुक्यात आठ ठिकाणी भूकंपमापन यंत्र बसवण्यात आली आहेत. मात्र भूकंप झाल्यानंतर भूकंपमापन यंत्रांची नोंद दिल्ली येथे होते. त्यानंतर त्याची माहिती ईमेलद्वारे पाठवण्यात येते. त्यामुळे बसलेला धक्का समजण्यासाठी बराच अवधी लागतो.

आपत्कालीन परिस्थितीशी तोंड देण्यासाठी  जवान सज्ज आहेत. डहाणू, तलासरी तालुक्यांत ४१ ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेतल्याने भूकंपाविषयी भीती कमी झाली आहे.    – अरखित जैना, कमांडर, एनडीआरएफ

या भागातील रहिवाशांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. कामकाज सोडून लोकांना भूकंपाच्या भीतीने घरातच थांबावे लागते. लहान मुले शाळेत जात नाहीत. घराला तडे गेले आहेत. सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी.    – साईनाथ पटारा, रहिवासी

सध्याची परस्थिती पाहता जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. एनडीआरएफ, नागरी संरक्षक दलाचे जवान सज्ज आहेत. परिस्थिती उद्भवल्यास आणखीन मदत मागवता येईल.    – सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी, डहाणू