शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत ऑनलाइन प्रवेश मिळूनही शाळेत प्रवेश नाही

समाजातील दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने शिक्षणाचा हक्क हा कायदा आणला आहे. या कायद्याद्वारे मुलांना खासगी शाळांमधून प्रवेश देण्यात येतो आणि मुलांचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जातो. या कायद्यानुसार मीरा-भाईंदरमधील वेदांत सुरवसे या विद्यार्थ्यांला एका खासगी शाळेत प्रवेश देण्यात आला, परंतु महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे मुलाला शाळेत अद्याप प्रवेश मिळालेला नाही. शाळा सुरू होण्यासाठी आता अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. विद्यार्थ्यांचे पालक मुलाच्या शाळा प्रवेशासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.

शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांना दुर्बल आणि वंचित घटकांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा शाळांची यादी तयार करून शासन विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश देत असते. त्यानुसार मीरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील शाळांची यादी तयार करण्यात आली आणि ती ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आली.

काशिमीरा येथील महाजनवाडी येथे राहणाऱ्या श्रीकांत सुरवसे यांनी आपला पाल्य वेदांत याला पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइनची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर श्रीकांत सुरवसे यांना ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून दहिसर चेकनाकाजवळ असलेल्या सिंगापूर इंटरनॅशनल या शाळेत प्रवेश देण्यात आला असल्याचे कळवण्यात आले. त्यासंदर्भातले प्रवेशपत्रही सुरवसे यांना देण्यात आले.

या पत्रानुसार सुरवसे या शाळेत दाखल झाले असता शाळेने त्यांच्या पाल्याला प्रवेश देण्यास असमर्थता दाखवली. मुळात सिंगापूर इंटरनॅशनल ही शाळा निवासी शाळा असल्याने या शाळेचा समावेश शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार करण्यात आलेल्या शाळांच्या यादीत करणे चुकीचे होते. तशा आशयाचे पत्रही या शाळेने महापालिकेच्या शिक्षण विभागाला दिले असल्याचे शाळेने सुरवसे यांना सांगितले. मात्र तरीही शाळेचे नाव यादीत कायम राहिल्याने घोळ निर्माण झाला आहे. परिणामी, वेदांत याच्या शाळा प्रवेशाचा विषय तसाच प्रलंबित राहिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरवसे हे महापालिकेचा शिक्षण विभाग, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग याठिकाणी मुलाच्या प्रवेशासाठी फेऱ्या मारत आहेत. सध्या प्रवेश मिळालेल्या शाळेत तांत्रिक बाबीवर प्रवेश मिळत नसेल तर ऑनलाइन पद्धतीने दुसऱ्या शाळेत प्रवेश देण्यात यावा, अशी साधी मागणी श्रीकांत सुरवसे यांनी केली आहे. मात्र आतापर्यंत त्यांची कोणीही दखल घेतलेली नाही.

प्रवेशाचा प्रश्न अनुत्तरितच

शालेय विद्यार्थ्यांच्या समस्येवर संघर्ष करणाऱ्या ‘अनुदानित शिक्षा बचाव समिती’ने यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाकडे तक्रारदेखील दाखल केली आहे. यावर या विभागाने महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून खुलासा मागवला आहे, अशी माहिती समितीचे अ‍ॅड्. किशोर सामंत यांनी सांगितले. शाळा सुरू व्हायला आता अवघे आठ दिवस शिल्लक राहिलेले आहेत, परंतु वेदांत याच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिला आहे.

सिंगापूर इंटरनॅशनल ही शाळा निवासी शाळा असल्याने तिचे नाव यादीत समाविष्ट करण्याची चूक झाली आहे. प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरू झाली असून या फेरीत वेदांत सुरवसे याला अन्य शाळेत प्रवेश दिला जाईल.     – भास्कर बाबर, शिक्षणाधिकारी, मीरा-भाईंदर महानगरपालिका