|| नीलेश पानमंद

खिडकीचे गज उचकटून रुग्णांची सुटका

ठाणे : मुंब्य्रातील प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयातील विद्युत दिवे बुधवारी पहाटे अचानक चालू-बंद होऊ लागले. काही कळायच्या आतच सर्वच धुराचे लोट पसरू लागले आणि भेदरलेले रुग्ण आणि परिचारिकांनी मदतीसाठी धावा सुरू केला. हा गोंधळ ऐकून रुग्णालयाच्या इमारतीत धाव घेणारे अ‍ॅड. फरहान अन्सारी आणि तन्वीर मलिक यांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज उचकटून नऊ रुग्णांना बाहेर काढले. दुर्दैवाने त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. पण या दोघांच्या प्रसंगावधानाने पाच जणांचे प्राण वाचले. रुग्णालयात ठेवलेले ३० ते ३५ प्राणवायूचे सिलिंडरही या दोघांनी अन्य रहिवाशांच्या मदतीने हटवण्यात आले.

मुंब्रा येथील प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयाच्या विद्युत मीटर रूममध्ये बुधवारी पहाटे ३.४० वाजता आग लागली. यामुळे रुग्णालयातील विद्युत दिवे चालू-बंद होऊ लागले. काही वेळातच विद्युत दिवे बंद झाले आणि सर्वत्र अंधार पसरला. आगीमुळे रुग्णालयात धूर पसरला. या प्रकारामुळे रुग्ण, नातेवाईक आणि परिचारिका भेदरले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केला. रुग्ण आणि नातेवाइकांची पळापळही सुरू झाली, पण अंधारामुळे बाहेर पडणे शक्य होत नव्हते. या रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस अ‍ॅड. फरहान अन्सारी आणि तन्वीर मलिक हे राहतात. तन्वीर मलिक हे रमजानचा उपवास सुरू करण्यासाठी पहाटे उठले होते. तर, अ‍ॅड. अन्सारी हे आरडाओरड ऐकून उठले. रुग्णालयाला आग लागल्याचे दिसताच या दोघांनी इमारतीच्या मागच्या बाजूस असलेल्या खिडकीचे लोखंडी गज उचकटून रुग्णांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यांच्या मदतीला इतर नागरिकही धावले. या सर्वांनी एकूण नऊ रुग्णांना खिडकीतून बाहेर काढले. त्यामध्ये अतिदक्षता विभागातील पाच रुग्णांचा समावेश होता.  या रुग्णालयामध्ये ३० ते ३५ प्राणवायू सिलिंडरचा साठा ठेवण्यात आला होता. ही बाब रुग्णांना रुग्णालयातून बाहेर काढणाऱ्या अ‍ॅड. फरहान यांना  समजली आणि त्यानंतर त्यांनी जिवाची पर्वा न करता स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयातील ३० ते ३५ सिलिंडर बाहेर काढले.

घरी नेण्यासाठी मुलांकडे आग्रह

मुंबईतील भायखळा भागात राहणाऱ्या हलीमा सलमानी (७०) यांना किडनी आणि मधुमेहचा त्रास होता. त्यांची नियाज आणि रिझवान ही दोन्ही मुले मुंब्य्रात राहतात. त्यामुळे प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयामध्ये हलीमा यांच्यावर सुरू होते.

मंगळवारी सकाळी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची मुलगी नईमा शेख यांनी सांगितले की, सायंकाळी त्यांची प्रकृती चांगली होती. त्यावेळेस प्रकृती ठीक असल्यामुळे घरी घेऊन चला असे त्या मुलांना सांगत होत्या. पण, डॉक्टरांनी सांगितल्यानंतर घरी जाऊया असे त्यांना मुलांनी सांगितले होते. रात्री २ वाजता त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आणि आगीच्या दुर्घटनेनंतर त्यांना दुसरीकडे नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

काही तासांच्या फरकाने मृत्यूशी गाठ

मुंब्रा येथील आंबेडकनगर भागात हरीश सोनावणे हे राहत होते. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे शनिवारी प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री त्यांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला होता. त्यामुळे त्यांना सकाळी करोना रुग्णालयात हलविण्यात येणार होते. पण, आगीच्या दुर्घटनेनंतर रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली, त्यावेळेस त्यांची पत्नी त्यांच्यासोबत होती. त्याचा मुलगा विशाल याने सांगितले की, या घटनेमुळे आईला मोठा धक्का बसला असून तिने आम्हाला काहीच कळविले नव्हते. सकाळी करोना रुग्णालयात बोलाविले. तेव्हा हा प्रकार समजला.

 

रमजानचा उपवास सुरू करण्यासाठी मी पहाटे उठलो होतो आणि त्यावेळेस रुग्णालयात आग लागल्याचा प्रकार माझ्या निदर्शनास आला. त्यानंतर मी, फरहान आणि परिसरातील इतर नागरिकांनी रुग्णांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. इतरांचे जीव वाचविल्याचे खूप समाधान आहे. परंतु काहींना जीव गमवावा लागला त्याचे दु:खही आहे. – तन्वीर मलिक, स्थानिक रहिवासी

माझी आईसुद्धा प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी जात असते. या रुग्णालयाला आग लागली, त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर आई दिसली आणि त्यामुळेच कोणताही विचार न करता रुग्णांच्या मदतीसाठी तात्काळ धावलो. रुग्णालयातील प्राणवायू सिंलिडर काढताना काहीही घडू शकले असते. पण, इतरांचे जीव वाचवू शकलो याचे मोठे समाधान आहे. – अ‍ॅड. फरहान अन्सारी, स्थानिक रहिवासी