वाढलेली मागणी, पावसाळ्यापूर्वीची कामे, ऐरोलीतील आगीमुळे सलग दोन दिवस वीजपुरवठा खंडित
विजेच्या वाढलेल्या मागणीमुळे वीजपुरवठा खंडित होणे, त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल दुरुस्तीची कामे आणि ऐरोलीतील आगीची घटना यामुळे शुक्रवार आणि शनिवारी ठाणे शहरात विजेच्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेला विजेचा लपंडाव शुक्रवार आणि शनिवारीही सुरू होता. वीजपुरवठा खंडित होण्याच्या या प्रकाराने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे महावितरणच्या विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
उन्हाळ्याच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या असून दिवसरात्र प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. त्यामुळे घामाघूम नागरिक पंखे, कूलर, एसीचा मोठय़ा प्रमाणात वापर करत आहे. विद्युत उपकरणांच्या वाढलेल्या वापरामुळे विजेची मागणी वाढली असून यामुळे वीजपुरवठा यंत्रणा बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. ती पुन्हा सुरू करण्यास १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागत आहे. ठाण्यातील कोपरी परिसरात या प्रकारामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागला आहे. तर दुसरीकडे महावितरणच्या वतीने पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असून त्यासाठी तासन्तास वीजपुरवठा खंडित होत आहे. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये अशी कामे सुरू असून त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. आधीच उन्हाच्या झळांनी कासावीस झालेल्या नागरिकांना वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठाण्यातील कोपरी, मुंब्रा, कळवा, पाचपाखाडी, नौपाडा, वागळे इस्टेट या परिसरामध्ये सलग दोन दिवस हा त्रास सुरू आहे. शहरातील या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराबरोबरच अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमुळेही शहरवासीयांची वीज कोंडी झाली आहे.
नवी मुंबईच्या ऐरोली परिसरातील यादवनगर येथील गुरुवारी भंगारच्या गोडाऊनला आग लागली होती. या ठिकाणी ठाणे शहरातील मुंब्रा आणि अन्य भागांत वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्या आहेत. आगीच्या झळा सुमारे ३० फुटांहून उंच उसळल्या होत्या. या झळांमुळे वीजवाहिनीची जोडणी पूर्णपणे गळून पडली, शिवाय आगीमुळे वीजवाहिनीचे काम करणे तात्काळ शक्य होत नव्हते. शिवाय शहराला वीजपुरवठा करणारी दुसरी वीजवाहिनी नसल्याने या भागाचा वीजपुरवठा १२ तासांहून अधिक काळ बंद होता. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणचे कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रयत्नानंतर शुक्रवारी पहाटे सुरळीत झाला, अशी माहिती भांडुप परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय पवार यांनी दिली. त्याच वेळी कोपरी ठाणे परिसरातील साईनाथनगर येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे सावरकरनगर, वाल्मीकीनगर परिसरातील वीजपुरवठा रात्री साडेआठ वाजता बंद झाला होता. त्यामुळे ठाणे पूर्वेतील सगळ्याच भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.