के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय व्यवस्थापनाकडून अन्याय केला जात आहे असा आरोप करत येथील कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. या प्रकरणी राज्यपाल, मुंबई विद्यापीठ, शिक्षण मंत्री यांच्याकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात येत नाही. शासन, विद्यापीठ पातळीवरील या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी पेंढरकर महाविद्यालयातील अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतील तीस कर्मचारी १५ जुलै रोजी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसणार आहेत.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुंबई विद्यापीठ, शिक्षण उपसंचालक, मानपाडा पोलिस यांना अर्जाद्वारे माहिती देण्यात आली आहे. महाविद्यालयातील प्रशासन, प्रयोगशाळा विभागातील लिपीक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिपाई, सेवक आदी संवर्गातील हे कर्मचारी आहेत. महाविद्यालय व्यवस्थापनाकडून गेल्या काही वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर खूप अन्याय चालवला आहे, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुट्टीकालीन रजा रद्द करण्यात येत आहेत. या सुट्टया घेणाऱ्यांचे वेतन कापण्यात आले आहे. काही कर्मचारी निवृत्त होऊन दोन ते तीन वर्ष लोटली आहेत, तरी त्यांचे निवृत्ती वेतन सुरू झालेले नाही. या निवृत्त कर्मचाऱ्यांची परिस्थिती खूप हालाखिची झाली आहे. कर्मचाऱ्यांवर महाविद्यालयात सतत पाळत ठेवण्यात येते, अशा या तीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. पेंढरकर महाविद्यालयाच्या कारभारासंबंधी विद्यापीठ अधिसभेत अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. विद्यापीठाने महाविद्यालयाच्या कारभाराची गेल्या दोन महिन्यापूर्वी चौकशी केली आहे. चौकशी समितीच्या सदस्यांना महाविद्यालयात आलेले भयावह अनुभव त्यांनी चौकशी अहवालात नमूद केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. विद्यमान कुलगुरूंनी या तक्रारींकडे नेहमीच दुर्लक्ष केले असे संघटनेचे म्हणणे आहे. मुंबई विद्यापीठाचे नवीन कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी याप्रकरणाची दखल घ्यावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. याप्रकरणी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही तो होऊ शकला नाही.