लाखोंची उलाढाल; स्थानिकांकडून हप्तेबाजीलाही ऊत

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील टाटा पॉवर नाका ते गोळवली गावाच्या हद्दीत भर रस्त्यात सुमारे ३०० फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू आहे. या फेरीवाला बाजारात दर महिन्याला सुमारे २१ लाख रुपयांची उलाढाल होते. या उलाढालीतील एक पैशाचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा केला जात नाही. असे असताना महापालिका, पोलीस, महसूल अशा सगळ्या यंत्रणांच्या आर्शीवादाने भरणाऱ्या या बेकायदा बाजाराकडे प्रशासकीय यंत्रणांचे सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या बाजारातून स्थानिक बाजारबुणगे, गावपाटलांचे खिसे मात्र रोजच्या रोज भरले जात असल्याची माहिती आहे. या वर्दळीच्या रस्त्यावर काही अपघात झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख उपायुक्त सुरेश पवार यांची नियमित ये-जा असणारा हा मार्ग आहे. तेही या अनधिकृत फेरीवाला बाजारावर कारवाई व्हावी, यासाठी पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटविण्यात येत नसल्याने रहिवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सर्वसाधारण सभेत विषय चर्चेला घेतला होता. या वेळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी महापालिका कर्मचारी कसे फेरीवाल्यांकडून हप्तेखोरी करून फेरीवाल्यांना रस्त्यावर बसवितात याची माहिती आयुक्त ई. रवींद्रन यांच्यासमोर उघड केली. आयुक्तांनी तातडीने फेरीवाला हटाव पथकातील सर्व कामगारांच्या अन्यत्र बदल्या केल्या आहेत. तसेच, फेरीवाल्यांना हटविण्यासाठी कृतिदल स्थापन केले आहे. हे दल रेल्वे स्थानक भागात कार्यरत आहे. पण महापालिका हद्दीतील गोळवली येथील शिळफाटा रस्त्यावर दररोज संध्याकाळी भरणाऱ्या फेरीवाल्यांच्या बाजाराकडे पालिका, पोलीस प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे.

अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू असलेल्या शिळफाटा मुख्य रस्त्यावर हा बाजार भरतो. एखादा वाहनाचा अपघात झाल्यास या ठिकाणी मोठा अनर्थ घडू शकेल, अशी भीती यापूर्वीही व्यक्त करण्यात आली आहे. शिळफाटा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. या प्राधिकरणाचे या रस्त्यावरील अतिक्रमणांकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. महापालिकेकडून २७ गावांमधील फलक काढणे, अनधिकृत फलक होìडग उभारणाऱ्यावर नियमित कारवाई केली जाते. असे असताना गोळवली येथील ३०० ते ४०० फेरीवाल्यांवर महापालिकेची मेहरनजर कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बाजाराची पद्धत

गोळवली गावातील वजनदार गावपाटील पिता-पुत्र या ३०० फेरीवाल्यांचे नियंत्रक आहेत. हे सर्व फेरीवाले या गावपाटलाच्या चाकरीत आहेत. या फेरीवाल्यांचे एक नोंदणी पुस्तक आहे. बाजार लावण्यापूर्वी या नोंदणी पुस्तकावर प्रत्येक फेरीवाल्याने हजेरी लावायची. सामान आणण्यासाठी हा गावपाटील या फेरीवाल्यांना व्याजाने पैसे देतो. या फेरीवाल्यांकडून ग्राहकांनी खरेदी करावी म्हणून हाच गावपाटील ग्राहकांना खरेदीसाठी सावकारी पद्धतीने पैसे उपलब्ध करून देतो. गोळवली परिसरात चाळी, झोपडपड्डी अधिक संख्येने आहे. कोणी फेरीवाला गैरहजर राहिला तर तात्काळ त्या जागेवर पर्यायी फेरीवाला बसविला जातो. दररोजच्या व्यवहारात कोठेही खोट येता कामा नये, हा यामागील उद्देश. दर दिवसाला या बाजारातून ७० हजार रुपयांची उलाढाल होते. प्रत्येक फेरीवाल्याने शेठकडून घेतलेल्या पैशाप्रमाणे व्याजी पैसे त्याच दिवशी परत करायचे. अशा प्रकारे दर महिन्याला या बाजारातून सुमारे २० ते २१ लाखांची उलाढाल होते. या बाजारावर कारवाई होऊ नये म्हणून महापालिका, पोलीस, तलाठी, मंडळ अधिकारी, समाजकंटक, गावगुंड यांचा उपद्रव नको म्हणून सुमारे एक ते दीड लाख रुपये असे एकूण ५ ते ६ लाख रुपये प्रशासकीय निधी म्हणून बाजूला काढले जातात, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.