ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी एलईडी दिव्यांचा वापर, तसेच निर्माल्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबवल्याने ठाणे महानगरपालिकेची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवडली झाली आहे. भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच स्कॉच ग्रुपच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचा यात समावेश आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक व आर्थिक क्षेत्राशी निगडित समस्या व इतर विषयांवर सन १९९७ पासून ‘स्कॉच ग्रुप’ काम करीत असून त्यांनी नुकतेच ‘स्मार्ट ई गव्हर्नन्स २०१५’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये भारतातील केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण ४०० नामांकने नोंदविण्यात आली होती. त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने ठाणे शहरामध्ये कार्यान्वित केलेल्या ऊर्जा कार्यक्षमता व पर्यावरणपुरक एलईडीचा रस्त्यांवरील दिव्यांसाठी वापर हा प्रकल्प तसेच प्रदूषण नियंत्रण कक्षाने ठाणे शहरातील मंदिरातून उत्सव काळात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती हे दोन प्रकल्प सादर केले होते. या स्पर्धेत भारतातील उत्कृष्ट ४० प्रकल्पांमध्ये या दोन प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेला ‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीट’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार २२ व २३ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान अपारंपरिक ऊर्जेची यंत्रणा कार्यान्वित करणे आणि तिचा प्रसार करणे यासाठी ठाणे महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन भारत सरकारच्या अपांरपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने महापालिका गटामध्ये तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार दिला आहे. २७ ऑगस्ट रोजी केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांच्या शुभहस्ते बंगलोर येथे एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.