आक्षेप घेण्याचा अवधी वाढवून देण्याची मागणी

पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असली तरी त्यात अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले आहे. मतदार याद्या प्रभाग हद्दीप्रमाणे फोड केल्या नसल्याचा आरोप मतदारांसह विद्यमान नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी केला आहे. प्रारूप मतदार यादीतील प्रभागनिहाय मतदारांची संख्या सदोष असून यासंदर्भात आक्षेप घेण्यासाठी अवधी वाढवून मिळण्याची मागणी त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.

पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी १४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना ही यादी त्या दिवशी सायंकाळी उशिराने प्रसिद्ध करण्यात आली. मात्र सर्वसामान्य नागरिक तसेच राजकीय पक्षांना ही यादी दोन दिवसांनंतर उपलब्ध झाल्याची तक्रार नगराध्यक्षांनी केली आहे. प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी असून प्रभाग रचनेप्रमाणे या याद्या तयार न केल्यामुळे काही प्रभागांतील मतदारसंख्या १४०० मतदारांहून कमी असून सुमारे चार प्रभागांची मतदार संख्या चार हजारांहून अधिक आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे अनेक मतदारांचे प्रभाग अदलाबदल झाल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या असून मतदारांना या याद्यांची पाहणी करून त्यासंदर्भातील आक्षेप नोंदवण्यास अवधी कमी पडत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे मतदार याद्यांसंदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी अवधी वाढवून मिळावा, अशी मागणी मतदारांनी केली आहे.

पालघर नगर परिषदेच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप नगराध्यक्षांनी केला आहे. प्रारूप मतदार यादी तयार करताना विशिष्ट व्यक्तीचा फायदा किंवा लाभ केंद्रित केल्याचे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यामुळे मतदार यादीतील दोष व चुका यांबाबत हरकत घेण्यासाठी १८ फेब्रुवारीपर्यंतची मर्यादा पुरेशी नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सदोष यादी तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पालघरच्या नगराध्यक्षांसह इतर काही नगरसेवकांनीही प्रारूप मतदार याद्यांमधील त्रुटीबाबत आक्षेप नोंदवून या याद्या तयार करण्यास काही राजकीय मंडळींचा लाभ साधला गेला असल्याकडे लक्ष वेधले आहे. पालघरच्या मतदार यादीत त्रुटी कायम राहिल्यास त्याचा मतदानावर परिणाम होऊन निवडणूक निकालावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. पालघरमधील काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागातून अन्य प्रभागांत वर्ग करण्यात आलेल्या मतदारांचे दुरुस्ती अर्ज भरून घेण्याचा मोहीम राबवली असून अशा प्रकारचे शेकडो अर्ज पालघर नगर परिषद कार्यालयात दाखल केले आहेत. या अर्जावर नगर परिषदेचे कर्मचारी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करून पुढील निर्णय घेणे अपेक्षित आहे. आक्षेप नोंदवण्यासाठी वाढीव अवधी मिळण्यासंदर्भातील अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पालघर नगर परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पालघर तहसील कार्यालय यांच्यासह संकेतस्थळावर पालघर नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी प्रकाशित करण्यात आली होती. ही प्रारूप मतदार यादी शेकडो पानांची असल्याने त्याचे झेरॉक्स काढून प्रत उपलब्ध करून देण्यास अवधी लागला. प्रारूप मतदार यादी संदर्भात पडताळणी करण्यासाठी नगर परिषद कर्मचारी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन पाहणी करतील आणि तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास अंतिम मतदार यादीत आवश्यक बदल केले जातील.    – प्रशांत ठोंबरे, मुख्याधिकारी, पालघर नगर परिषद