ऐरोलीच्या दत्ता मेघे महाविद्यालयात १५ सप्टेंबर रोजी असलेला अभियांत्रिकी दिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने महाविद्यालयाच्या कम्प्युटर इंजिनीअरिंग विभागाच्या वतीने काही खास स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘टेकबेट’ (टेक्निकल डिबेट) म्हणजेच तांत्रिक विषयांवर आधारित वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणाशी संलग्न अशा ‘विंडोज विरुद्ध लिनक्स’सारखे विषय स्पर्धकांना या वेळी देण्यात आले होते. त्याचप्रमाणे ‘टेक क्विज’ या तांत्रिक प्रश्नमंजूषेचेही आयोजन करण्यात आले होते. ‘टेक्निकल हंट’ या मनोरंजनपूर्व परंतु तांत्रिक शिक्षण देणाऱ्या अनोखी स्पर्धाही या वेळी घेण्यात आली होती. टेक्निकल हंट या स्पर्धेत स्पर्धकांना स्पर्धेसाठी अंतिम लक्ष्य गाठावे लागणार होते. त्यासाठी त्यांना विशिष्ट खुणांचीही मदत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या उत्साहात हाही खेळ उत्तमरीत्या पार पडला. त्याचप्रमाणे ‘सिने इंजिनीअर्स’ या अभियांत्रिकीशी संबंधित पॉवर पॉइंट सादरीकरण स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. ‘आस्क मी एनिथिंग’ असे म्हणत कुठल्याही तांत्रिक प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या आगळ्या वेगळ्या रोबोचेही दर्शन या निमित्ताने विद्यार्थ्यांना झाले. हा अनोखा रोबो आदित्य खांडकर या विद्यार्थ्यांने बनविला होता. तांत्रिक स्पर्धाबरोबरच अवघड आव्हानांना पेलायला लावणाऱ्या; परंतु मनोरंजक अशा ‘टाइम आऊट’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या कम्प्युटर इंजिनीअरिंग विभागाच्या तीस विद्यार्थ्यांनी मिळून या स्पर्धाचे आयोजन केले.

‘बिर्ला’त गणेशोत्सव धूमधडाक्यात
ठाणे : गणेशोत्सवात घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते मात्र विद्येचे घर असलेल्या महाविद्यालयात बुद्धीच्या आराध्य दैवताची प्रतिष्ठापना करून बिर्ला महाविद्यालयाने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. बिर्ला महाविद्यालयाच्या पर्यावरण विज्ञान विभागातर्फे गेली दहा वर्षे महाविद्यालयात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. पर्यावरणभिमुख गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती करणे या उद्देशातून दर वर्षी महाविद्यालयातील विद्यार्थी सजावट करत असतात. या वर्षीसुद्धा पर्यावरणाचे समतोल कसे राखता येईल याची माहिती देणारा देखावा विद्यार्थ्यांनी साकारला आहे. जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी, तिची उत्पादकता वाढवण्यासाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केला जावा, तसेच नैसर्गिक शेती हा उत्तम पर्याय ठरू शकते असे माहिती या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आली आहे. धान्य आणि फुलांच्या माध्यमातून प्रदर्शनात मांडलेले अलंकार, लाकडाची बैलगाडी, झाडू आणि आगपेटीच्या काडय़ांपासून तयार केलेली शेतातील घरे या देखाव्यातून विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याचे दर्शन घडते. विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेली क्षेपणास्त्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

खर्डी महाविद्यालयात आरोग्य शिबीर
ठाणे : शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे आरोग्यसुद्धा निरोगी राहावे, या उद्देशातून जीवनदीप शिक्षण संस्थेच्या खर्डी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची रक्ततपासणी व एचआयव्ही तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. खर्डी ग्रामीण रुग्णालय आणि खर्डी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने खर्डी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘खर्डी महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागात राहणारे आहेत. दैनंदिन कामांमुळे विद्यार्थ्यांचे विशेषत: विद्यार्थिनींचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून या आरोग्यशिबिराचे आयोजन करण्यात आले,’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी दिली. खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भावना तेलंग, सत्यवान पाखरे, साहाय्यक इम्रान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले. तसेच या वेळी शिबिरात प्राचार्य पी. डी. पाटील, प्राध्यापकवर्ग व रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.

‘एसआयसीईएस’मध्ये  आगळा गणेशोत्सव
अंबरनाथ : अंबरनाथमधील एस.आय.सी.ई.एस. महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासह विविध उपक्रम राबविले. जंगलतोडीचे परिणाम, जागतिक तापमानवाढ, पाणी वाचवा आदी विषयांशी निगडित सजावट करण्यात आली होती. राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागप्रमुख प्रा. शरद आवटे व प्रा. प्रियांका पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या पाच दिवसांत विविध उपक्रमांमध्ये प्रथम विद्यार्थिनीची थॅलेसेमियाची तपासणी, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, अभ्यासिका वर्ग, योगा वर्ग आदींचे आयोजन करण्यात आले होते. गणपतीचे विसर्जन महाविद्यालयातील पाण्याच्या टाकीत करण्यात आले व ते पाणी महाविद्यालय परिसरातील झाडांना घालण्यात आले. या सर्व कार्यक्रमांच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष के. एस. के. नायर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील आदी उपस्थित होते.

बिर्ला महाविद्यालयात सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्घाटन
कल्याण : दिवसेंदिवस दुर्मीळ होत चाललेल्या आणि विद्यार्थ्यांच्या नजरेतून हरवत जाणाऱ्या जुन्या वस्तू विद्यार्थ्यांसमोर याव्यात, या उद्देशातून कल्याणातील बिर्ला महाविद्यालयात सामाजिक शास्त्र मंडळाची सुरुवात करण्यात आली आहे. या मंडळाचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयात करण्यात आले. सामाजिक शास्त्र मंडळाच्या वेळी जुन्या वस्तूंचे प्रात्यक्षिकासह प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी भरविलेल्या हस्तलिखितांचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. सामाजिक शास्त्राचा उद्देश स्व-जाणीव, निर्णयक्षमता, सर्जनशील विचार आणि प्राथमिक समाज कुटुंबापासून विशालरूपी समाजसागरात पोहावयास शिकविणे हा उद्देश या मंडळ सुरू करण्यामागे असल्याचे प्रा. स्मृती पवार यांनी या वेळी सांगितले. सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य नरेश चंद्र आणि डॉ. स्वप्ना समेळ यांच्या हस्ते झाले.

रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधीलकी
ठाणे : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य साधून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजातील वंचित लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवले, अनेक शाळा व महाविद्यालयांची स्थापन केली. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सामाजिक उपक्रम करणे योग्य ठरेल या उद्देशातून हे रक्तदान शिबीर भरवण्यात आले. महाविद्यालयातील एकूण ५५ विद्यार्थ्यांनी या शिबिरात रक्तदान केले. विद्यार्थ्यांसोबत संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे, प्राचार्य संतोष गावडे आणि प्राध्यापक यांनीही या शिबिरात सहभाग घेतला.

अग्रवाल महाविद्यालयात गांधी महोत्सव
ठाणे : जागतिकीकरण, खसगीकरण, कौटुंबिक मूल्यांचा ऱ्हास या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये विधायक प्रेरणा निर्माण होण्यासाठी महात्मा गांधी यांची अहिंसा वृत्ती, त्यांची विचारधारा याचे संस्कार महत्त्वाचे ठरतात. या पाश्र्वभूमीवर कल्याणच्या के. एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या वतीने गांधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गांधी जयंतीचे औचित्य साधून ३० सप्टेंबर आणि १ व ३ ऑक्टोबर हे तीन दिवस हा महोत्सव महाविद्यालयात होणार आहे. महात्मा गांधींच्या विचारांची महती सांगणाऱ्या या महोत्सवात यांच्यावर लिहिलेल्या साहित्याचे, चित्राचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन होणार आहे.
गांधींजींच्या विचारांचे दर्शन या महोत्सवाच्या माध्यमातून घडणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आहेत. तसेच वस्त्र स्वावलंबन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांसारखे काही उपक्रम यादरम्यान घेण्यात येणार आहेत.
महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित भित्तिपत्रक या वेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच वेळी भारती विद्या भवनचे कार्यकर्ते रमेश ओझा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
संकलन : किन्नरी जाधव