वसईमध्ये बनावट मद्यनिर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त; दोघांना अटक

नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी मद्याची वाढती मागणी लक्षात घेऊन बनावट मद्यविक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. देशी मद्यात विशिष्ट काळा रंग टाकून विदेशी मद्य तयार केले जात आहे. हे बनावट मद्य नामांकित कंपन्यांच्या बाटल्यांत भरून ते सीलबंद करून विक्री केली जात आहे. राज्य उत्पादक शुल्काने बनावट मद्य तयार करणाऱ्या टोळीला अटक केल्यानंतर बनावट मद्यनिर्मितीचा हा प्रकार समोर आला आहे.

गेल्या महिन्याभरापासून राज्य उत्पादक शुल्क विभाग विविध ठिकाणी छापे घालून हातभट्टीचे अड्डे तसेच चोरटी दारू जप्त करत आहेत. बुधवारी रात्री राज्य उत्पादक शुल्क विभागाने विरारच्या गडगापाडा येथे बनावट मद्यनिर्मिती करणारा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत पथकाने अरुण निशाद (१८) या आरोपीला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून सफाळा येथून त्याचा साथीदार रवींद्र घरत (४८) याला अटक केली. राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. एम. लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर मोरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन संखे, रवी कोळसे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. बुधवारी अर्नाळा परिसरात छापा घालून १० हातभट्टय़ांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि दोन लाख रुपये किमतीची हातभट्टीची दारू नष्ट केली.

तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष

बेकायदेशीर दारूची निर्मिती तसेच विक्रीबाबत तक्रार करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पालघर येथील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. ०२५२५-२४०४२२ हा क्रमांक आणि  १८००८३३३३३ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. नाताळ आणि नवीन वर्ष स्वागत समारंभाच्या पाटर्य़ावर लक्ष ठेवण्यासाठी वसई, पालघर आणि डहाणू निरीक्षकांचे पथकही स्थापन करण्यात आले आहे.

बनावट मद्यनिर्मिती कशी?

* देशी मद्यात विशिष्ट प्रकारचा काळा रंग टाकून ते नामांकित कंपन्याच्या बाटल्यात भरले जाते.

* या बाटल्यांना मेणबत्तीने सील  केले जाते.

* १०० रुपयाच्या देशी मद्यात भेसळ करून ते २५० ते ३०० रुपयांत विदेशी मद्य म्हणून विकले जाते.

३०२ जणांना अटक

पालघरच्या राज्य उत्पादक शुल्क विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर या सात महिन्यांत जिल्ह्यात बेकायदेशीर दारू अड्डय़ांवर कारवाई केली. या कारवाईत ७९३ गुन्हे दाखल करून ३०२ जणांना अटक केली. या कारवाईत १ कोटी ८६ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.