शेकडो महिलांना गंडा; विरारमधील तिघांना अटक

महिलांना रोजगारासाठी अर्थसाहाय्य मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका टोळीला विरार पोलिसांनी गजाआड केले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ही बनावट योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे लाखो महिलांची फसवणूक झाली आहे.

विरार पूर्वेच्या साईनाथ रोड येथील परमार्थ अपार्टमेंटमध्ये अंबिका रोजगार नावाने एक संस्था उघडण्यात आली होती. या संस्थेची चालक महिलेनेने एक पत्रक काढून परिसरात वाटले होते. रोजगार सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाईल, तसेच नोकरी लावून दिली जाईल, असा दावा या पत्रकात करण्यात आला होता. हाऊसकीपिंग, लहान मुलांना सांभाळणे, रुग्णांची देखभाल, शाळेत शिपाई आदी जागांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. अनेक महिलांनी नोकरीसाठी आणि कर्ज घेण्यासाठी या संस्थेत संपर्क केला होता. या सर्व महिला मध्यमवर्गीय आणि कष्टकरी वर्गातल्या होत्या. याच वेळी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या नावाने एका योजनेचे नाव सांगून महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले होते. कमिशनपोटी सुरुवातील ५०० रुपयांपासून अगदी २० हजार रुपये उकळले होते. मात्र विविध सबबी सांगून कर्ज देण्यास तसेच नोकरी लावण्यास टाळाटाळ केली जात होती. वारंवार विचारणा करूनही भरलेले पैसे मिळत नाही, कर्ज मिळत नाही आणि नोकरीही मिळत नसल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यांनी हा प्रकार भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा सुदीप्ती सिंग यांना सांगितला. त्यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह या कार्यालयावर जाऊन जाब विचारला आणि संस्थाचालक महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले.  हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर विरार पोलिसांनी संस्थाचालक महिलेसह तिघांना अटक केली. या प्रकरणात अनेक महिलांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. ही मोठी टोळी असून शहराच्या विविध भागांत कार्यालये थाटून फसवणूक केली जाते, असे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी सांगितले. फसवणूक झालेल्या महिलांनी विरार पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

गरीब महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणुकीचे हे रॅकेट सुरू होते. अगदी सफाईदारपणे ही संस्था महिलांची फसवणूक करत होती.

सुदीप्ती सिंग, जिल्हा उपाध्यक्षा, भाजप महिला मोर्चा