tvlogएखाद्या घरातला पेशंट तापाने पार फुललेला किंवा काही कारणाने जायबंदी झालेला असेल किंवा विकलांग असेल तर फॅमिली डॉक्टर त्याच्या घरी जाऊन त्याला तपासणार. गरज पडल्यास तपासण्यासाठी लागणारी काही उपकरणे एखाद्या कुटुंब सदस्याच्या मदतीने पेशंटच्या घरीसुद्धा नेणार. अगदी माफक व्हिजिट फीच्या मोबदल्यात हे काम होणार. अशा डॉक्टरांचा संबंध रुग्णाच्या केवळ व्याधीपुरता कधीच मर्यादित नव्हता. ते कुटुंबातील एक सदस्यच मानले जात. ठाण्यात असे अनेक डॉक्टर्स होते, आहेत.

अ नुभव ही माणसाच्या विविध विषयांतील ज्ञानात भर घालणारी एक महत्त्वपूर्ण बाब आहे. ज्ञानाप्रमाणेच अनुभवामुळे माणसाच्या कौशल्यांतही वाढ होते. याच कारणामुळे कुटुंबातील आजीबाईंना मोठा मान असतो. प्रत्येक बाबतीत आजीचा सल्ला घेतला जातो. कुटुंबातील कुणाचीही तब्येत बिघडली की तात्काळ आजी कोणते तरी घरगुती औषध तयार करून देणार हे ठरलेले. हाच तो ‘आजीबाईचा बटवा.’ त्यात सुंठ, लवंग, दालचिनीपासून वेगवेगळ्या गुटय़ांपर्यंत अनेक औषधी वाणं असतं. काळाच्या ओघात माणसाची जसजशी प्रगती होत गेली, तसतसे वैद्यकशास्त्रही प्रगत झाले. आजीबाईचे काम करण्यासाठी आता आधुनिक औषधे देणारे व सांगणारे ‘फॅमिली डॉक्टर’ तयार झाले. आजीबाईप्रमाणेच ते काही औषधं तयार करून देतात किंवा काही वेळा बाजारात मिळणारी तयार औषधे घ्यायला सांगतात. घराघरांत अशी एकेक आजी असे. त्याऐवजी आता शहराच्या एखाद्या मोहल्ल्यात एकेक फॅमिली डॉक्टर अशी व्यवस्था आपोआप स्थिरावली. त्यामुळे असे एक डॉक्टर आणि त्यांच्याकडे वैद्यकीय सल्ला घ्यायला येणारे त्यांचे पेशंटस् असे ध्रुवीकरण आपोआप होत गेले. या उभयांमध्ये आपुलकीचे, जिव्हाळ्याचे बंध आपोआप तयार निर्माण होतात. पेशंट डॉक्टरांकडे आला की अर्थातच प्रथम प्रकृती तपासणे व मग औषधोपचार. त्यानंतर पेशंट औषध बनवेपर्यंत डॉक्टर आणि पेशंट हमखास शिळोप्याच्या गप्पा मारत बसणार. त्यात घरातील अन्य माणसांची चौकशी आणि मग परिसरातील नुकत्याच होऊन गेलेल्या घटनांबद्दल गप्पा-गोष्टी, माहितीचे आदानप्रदान, हा ठरलेला क्रम.
एखाद्या घरातला पेशंट तापाने पार फुललेला किंवा काही कारणाने जायबंदी झालेला असेल किंवा विकलांग असेल तर फॅमिली डॉक्टर त्याच्या घरी जाऊन त्याला तपासणार. गरज पडल्यास तपासण्यासाठी लागणारी काही उपकरणे एखाद्या कुटुंब सदस्याच्या मदतीने पेशंटच्या घरीसुद्धा नेणार. अगदी माफक व्हिजिट फीच्या मोबदल्यात हे काम होणार. डॉक्टर देऊ इच्छिणारे दवाखान्यातले एखादे औषध घेऊन येण्यासाठी मग पेशंटच्या कुणी तरी जबाबदार नातलगाने डॉक्टरांबरोबर जाणे हे ओघानेच आले.
मलेरिया, फ्ल्यू, यांसारख्या एखाद्या साथीच्या आजाराची बाधा कुटुंबात झाली असेल तर अशा वेळेला हा सर्व घटनाक्रम एका वेगळ्या प्रकारे घडणार. एकाच साथीने बाधित झालेले कुटुंबातील तीन-चार जण घरातील एखाद्या खोलीतच अंतराअंतरावर झोपलेले असणार. इंजेक्शनच्या डिस्पोजेबल सुया व सिरिंज नसलेल्या काळात मग हा सर्व संच स्वयंपाकघरात आणून परत उकळून घ्यायचा. घरी आलेले फॅमिली डॉक्टर हा सर्व सोपस्कार होईपर्यंत अजिबात विचलित होणार नाहीत. एक तर या मधल्या काळात इतर पेशंटस्ला तपासणार, किंवा इतरांशी संवाद साधणार. शेजारी कुणी अन्य पेशंट असेल तर त्याचे नातलगही प्रेमाच्या हक्काने डॉक्टरांना बोलवायला येणार. अशा तऱ्हेने ही तपासणी व्हिजिट चांगलीच दीर्घसूत्री होणार. या सर्वाची अगोदरच कल्पना असेल तर डॉक्टर ‘व्हिझिट’चा हा सोहळा त्यांच्या दवाखान्याच्या वेळेबाहेर उरकून घेत.
फॅमिली डॉक्टर या संस्थेचे आणखी एक वैशिष्टय़ सांगितलेच पाहिजे. रोग्यासाठी आवश्यक तेवढे डोस कंपाऊंडरकडून घेऊन ते रोग्याच्या आप्तेष्टांच्या हाती अगदी माफक पैशात घरी पाठविले जात. औषधाची बाटली तयार करण्याचाही एक हृद्य सोहळा असे. डोस देण्याच्या बाटलीत प्रथम आवश्यक ती सर्व द्रव्ये एकत्र करण्यात येत. मग त्यात योग्य तेवढे पाणी घालून द्राव तयार होई. डोसांचे माप कळावे म्हणून मग त्या बाटलीवर सफेद कागदाच्या पट्टीची नक्षी तयार करून चिकटवली जाई. शिवाय टॉनिकवजा अन्य औषधे जी सॅम्पल म्हणून डॉक्टरांकडे येतात, त्यातील काही आपल्या पेशंटसाठी विनामूल्य पाठवून दिली जायची. थोडक्यात पेशंट व डॉक्टर हा नवा नातेसंबंध तयार होत असे.
अशा डॉक्टरांचा संबंध रुग्णाच्या केवळ व्याधीपुरता कधीच मर्यादित नव्हता. ते कुटुंबातील एक सदस्यच मानले जात. ठाण्यात असे अनेक डॉक्टर्स होते, आहेत.  त्यातील सहज आठवणाऱ्यांचा येथे उल्लेख करतो. अर्थात ही यादी परिपूर्ण निश्चितच नाही. जुन्या पिढीतील डॉक्टरांपैकी डॉ. मधुकर तथा अण्णा हाजरनीस हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी वैद्यकीबरोबरच योग विद्येचाही तळमळीने प्रसार केला. साहित्य तसेच इतर कलांचेही ते जाणकार होते. दुसरे म्हणजे वा. ना. बेडेकर. यांनी तब्बल तीन दशके वैद्यकीय सेवा केली. शहरातील शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. डॉ. सुभाष मुंजे विख्यात शल्यचिकित्सक होते. ते त्या काळातील सर्वात तरुण डॉक्टर होते. जळगांव आणि अलिबाग येथेही त्यांनी सिव्हिल सर्जन म्हणून काम केले. त्यांना शेरोशायरीचा शौक होता. उत्तम हर्मोनियमवादक अशीही त्यांची ख्याती होती. ‘बिहाइंड द मोस्क झूल’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्या काळात अलिबागसारख्या ठिकाणी फारशी अत्याधुनिक साधने उपलब्ध नसतानाही त्यांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. डॉ. मालती चिटणीस, डॉ. पंडित, डॉ. मोकाशी, डॉ. पाणंदीकर आदी अनेक डॉक्टर्स ठाणेकरांच्या स्मरणात आहेत.
काळाच्या ओघात वरील सर्व शब्दचित्रे आता बदलू पाहत आहे. केवळ मोठय़ा शहरांमधूनच हा बदल होतोय असे नव्हे. ग्रामीण भागातसुद्धा हा बदल होऊ लागला आहे. त्याची दोन मुख्य कारणे दिसतात. रोग्याला देण्यासाठीची बहुतेक सर्व औषधे आता कंपाऊंडरने बनवून द्यायची फारशी गरज राहिलेली नाही आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पनाच आता नाहीशी होत चालली आहे की काय, अशी भीती वाटते. त्यामुळेच की काय आता उरले सुरले फॅमिली डॉक्टरही पेशंटच्या घरी जायला मागत नाहीत. गावाला आता एकटादुकटा डॉक्टर पुरत नाही. माणसाच्या शरीराचे जेवढे अवयव, त्या प्रत्येक अवयवाचा एक एक स्पेशालिस्ट डॉक्टर अशी व्यवस्था आता रूढ होऊ पाहत आहे. हार्ट स्पेशालिस्ट, आय स्पेशालिस्ट, स्किन स्पेशालिस्ट, बोन स्पेशालिस्ट, ईयर स्पेशालिस्ट या प्रत्येक स्पेशालिस्टकडे रोगी गेला की मग त्यांच्या त्यांच्या प्रकारानुसार त्याच्या चाचण्या घ्यायच्या. म्हणजे हृदयाचा कार्डिओग्राम, छातीचा किंवा हातापायांच्या हाडांचा एक्स-रे, रक्ततपासणी, रक्त घटकांचे योग्यायोग्य प्रमाण दर्शविणारी चाचणी, खाण्यापूर्वीची चाचणी, खाण्यानंतरची चाचणी. अशा एक ना दोन, अनंत चाचण्या करून घ्यायच्या.
आता तर डॉक्टरी शास्त्र दिवसेंदिवस आणखी प्रगत होत चालले आहे. त्यानुसार अशी शक्यता गृहीत धरायला काहीच हरकत नाही की लवकरच डाव्या पायासाठीचे एक स्पेशालिस्ट आणि उजव्या पायासाठी दुसरे तयार होतील.