ठाण्यातील कोपरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या बेकायदा खासगी बसगाडय़ांविरोधात जनआंदोलन उभारणाऱ्या कोपरी संघर्ष समितीच्या काही पदाधिकाऱ्यांवर कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. खासगी बसचालकांकडून एक लाख ९० हजार रुपये घेऊन दररोज प्रत्येकी एका बसमागे १३० रुपये वसूल केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांवर आहे. या गुन्ह्य़ामुळे कोपरी संघर्ष समितीच्या आंदोलनाची पोलखोल झाली असून, या आंदोलनामागचा उद्देश समोर आला आहे.

कोपरी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजेश गाडे, विशाल ढेंगळे, जयेश बनसोडे, करण भंडारी आणि दिनेश ढेंगळे अशी आरोपींची नावे असून, यापैकी एकालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. घोडबंदर ते ठाणे पूर्व स्थानक या मार्गावर बेकायदा खासगी बसगाडय़ा धावतात. या बस वाहतुकीमुळे कोपरी परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या बस वाहतुकीविरोधात राजेश गाडे आणि त्याच्या साथीदारांनी कोपरी संघर्ष समितीची स्थापना करून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास कोपरीतील नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने खासगी बस वाहतूक काही दिवस बंद झाली होती.

दरम्यान, ही वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी राजेश गाडे आणि त्यांच्या साथीदारांनी खासगी बस संघटनेचे अध्यक्ष रेहमत्तुला पठाण यांच्याकडे तीन लाखांची मागणी केली होती. त्यापैकी त्यांनी एक लाख ९० हजार रुपये घेतले. त्यानंतर प्रत्येक बसमागे दररोज शंभर रुपये देण्याची मागणी करून त्याप्रमाणे पैसे घेण्यास सुरुवात केली. रेहमत्तुला यांच्या संघटनेत ५० ते ५५ सभासद असून या सर्वाच्या खासगी बसगाडय़ा आहेत. या प्रत्येक बसमागे हे पैसे घेतले जात होते. त्यानंतर त्यांनी शंभरऐवजी १३० रुपये घेण्यास सुरुवात केली. काही दिवसांनंतर त्यांनी आणखी एक लाख रुपये आणि प्रत्येक बसमागे दररोज दोनशे रुपयांची मागणी केली. मार्च २०१७ ते आतापर्यंत हा प्रकार सुरू होता. अखेर या प्रकाराला कंटाळून  रेहमत्तुला यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी दिली.

खंडणीसाठी ‘स्टिकर’चा वापर

काही महिन्यांपूर्वी कोपरी संघर्ष समितीचे राजेश गाडे आणि त्याच्या साथीदारांनी रेहमुत्तला व त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये गाडे आणि त्याच्या साथीदारांनी बसगाडय़ांवर अंकाचे चिन्ह असलेले स्टिकर लावण्यास सांगितले. तसेच ज्या बसगाडय़ांवर चिन्ह नसेल त्या बसगाडय़ांनी पैसे दिले नाहीत, असे ग्राह्य़ धरून त्या अडविण्यात येतील आणि त्या गाडय़ांचे नुकसान करून चालकांना मारहाण करण्यात येईल, असेही सांगितले. त्यानुसार रेहमत्तुला व त्यांच्या संघटनेच्या २५ ते ३० सदस्यांनी बसगाडय़ांवर अंकाचे चिन्ह असलेले स्टिकर लावून बस वाहतूक पुन्हा सुरू केली होती, अशी माहितीही तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.