भाईंदर उड्डाणपूलाजवळ असणाऱ्या कंपनीमध्ये लागलेल्या भीषण आगीवर तब्बल तीन तासांनतर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.  आगीची माहिती मिळताच मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवळपास १२ गाडया घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास कंपनीमध्ये आग भडकली.

आग लागलेल्या कंपनीमध्ये प्लॅस्टिकच्या शीट बनवल्या जातात अशी माहिती मिळत आहे. आग मोठी असल्याने आसपासच्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आग कशामुळे भडकली ते अजून समजू शकलेले नाही. काही वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेजारी असलेल्या अल कॅन कंपनीला अशीच भीषण आग लागली होती.