कुळगांव-बदलापूर नगरपालिकेत झालेल्या टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) घोटाळ्याप्रकरणी आता घोटाळ्यात सहभागी असलेल्यांचे फास आवळले जाऊ लागले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी उल्हासनगर गुन्हे शाखेने शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक व खासगी विकासक तुषार बेंबाळकर यांना बुधवारी मध्यरात्री अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी ही पहिली अटक आहे.

बदलापुरात उघडकीस आलेल्या टीडीआर हस्तांतरण प्रकारातील ५५ प्रकरणांत अनियमितता आढळून आली आहे. नियमबाह्य़ टीडीआर हस्तांतरण प्रकरणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने राज्य शासनाला याबाबत विचारणा केली असता शासनानेही चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीनंतर २०१० ते २०१३ दरम्यानच्या काळातील नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगररचनाकार, अभियंते व तत्कालीन नगराध्यक्ष यांच्यावर ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शोध शाखेने गुन्हे दाखले केले होते. मध्यंतरी उल्हासनगर सत्र न्यायालयाने या आरोपींचे अटकपूर्व जामिनही फेटाळले होते. त्यांच्यापैकी दोन अधिकाऱ्यांच्या अटकपूर्व जामिनावर येत्या २९ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले अधिकारी हे बेपत्ता असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. गेल्या आठवडय़ात बदलापूर नगरपालिकेच्या ३७ आजी-माजी नगरसेवकांची चौकशी व जवाब नोंदवल्यानंतर मिळालेल्या माहिती व पुराव्यानंतर या प्रकरणांमध्ये काही तत्कालीन खासगी विकासकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे निष्पन्न झाले होते.