News Flash

मासेमारीबंदी झुगारून मच्छीमारी बोटी समुद्रात

एकजूनपासून मासेमारी बंदी असली तरी वसईतले अनेक मच्छीमार बोटी समुद्रात गेल्या आहेत.

मत्स्य विभागाचे कारवाई करण्याचे आदेश; मच्छीमारांमध्ये दुफळी
एकजूनपासून मासेमारी बंदी असली तरी वसईतले अनेक मच्छीमार बोटी समुद्रात गेल्या आहेत. मासेमारीबंदीच्या नियम पाळण्यास त्यांनी नकार दिल्याने मच्छीमारांमध्ये दोन गट पडले असून तणाव निर्माण झाला आहे. मत्स्य विभागाने मात्र १ जूननंतर समुद्रात आढळणाऱ्या बोटींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
यंदा राज्य सरकारने १ जूनपासून मासेमारीबंदीची घोषणा केली आहे. १ जूननंतर कुणालाही समुद्रात मासेमारी करता येणार नाही. परंतु वसईतल्या २५ हून अधिक बोटी समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत. यंदा मच्छीमारांसाठी भयानक दुष्काळ पडला आहे. तेल सर्वेक्षण, पर्ससीन नेटमुळे झालेली बेसुमार मासेमारी यामुळे छोटय़ा मच्छीमारांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अनेक मच्छीमार कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे अनेक मच्छीमारांना कर्जाचे हप्ते फेडता येत नाही. त्यातच शासनाने १ जूनपासून मासेमारीला बंदी घातली आहे. ही बंदी झुगारून काही मच्छीमारांनी समुद्रात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी वसईतल्या सुमारे २५ बोटी समुद्रात गेल्या आहेत. त्या १ जूनपर्यंत परतणे शक्य नाही. यामुळे इतर किनाऱ्यावरील मच्छीमार संतप्त झाले असून त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ३१ मे रोजी मत्स्य विभागाकडून मच्छीमारांच्या डिझेल पंपावर सील करण्यात येते. आदेश डावलून काही बोटी समुद्रात गेल्याने मच्छीमारांमध्ये दोन गट पडून तणाव निर्माण झाला आहे.
पाचूबंदर विभागाचे परवाना अधिकारी संदीप दफ्तरदार यांनी या मच्छीमारी बोटींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या बोटी जर १ जूनच्या आत नाही परतल्या, तर त्यांच्यावर दंडात्मक तसेच जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. नौदल आणि सीमा शुल्क विभागाच्या बोटी समुद्रात गस्त घालत आहेत. त्यांनाही मच्छिमारी नौका आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 4:13 am

Web Title: fishermen ignore fishing ban imposed by maharashtra government
Next Stories
1 अनधिकृत बांधकामांना बुधवारची दहशत
2 शवविच्छेदन केंद्राला वैद्यकीय अधिकाऱ्याची प्रतीक्षा
3 रिक्षाचालकांना सव्वा लाखाचा दंड
Just Now!
X