एस.डी. बर्मन ते आत्ताच्या शंकर-एहसान-लॉय आदी संगीतकारांच्या गीतांचा अनमोल नजराणा बदलापूरकरांना गायनाच्या नव्हे तर बासरीच्या आवाजाने अनुभवण्याचा योग शनिवारी सायंकाळी आला. निमित्त होते सुप्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांच्या अमर बन्सी या कार्यक्रमाचे. बदलापुरातील ब्राह्मण समाज मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी तीन तास बासरीचे अनोखो रंग बदलापूरकर रसिकांनी ओक यांच्या बासरीवादनातून ऐकले. मुरबाडचे आमदार किसन कथोरे, आयोजक शमिंद्र कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अमर ओक यांच्या बासरीचे गारूड सारेगम या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमामुळे रसिकांच्या मनावर झाल्याने बदलापुरात झालेल्या या कार्यक्रमाला जवळपास एक हजार नागरिकांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाची सुरुवात सारेगम कार्यक्रमाच्या शीर्षकगीताने झाली. यावर रसिकांच्या उत्स्फूर्त टाळ्या घेत पुढे त्यांनी आर.डी. बर्मन, एस. डी. बर्मन, हृदयनाथ मंगशेकर, किशोर कुमार ते आत्ताचे शंकर महादेवन आदी संगीतकारांच्या गाजलेल्या गाण्यांचे सादरीकरण केले. ‘प्रथम तुला वंदितो’, ‘काय बाई सांगू’, ‘आता वाजले की बारा’ ही प्रसिद्ध मराठी गीतेही त्यांनी बासरीवर सादर केली. या कार्यक्रमात यावेळी सुगम व शास्त्रीय संगीताचा सुरेख मिलाफ साधण्यात आला. यावेळी यमन रागाबरोबरीनेच खमाज या रागाच्या हिंदी चित्रपटातील अनेक रचना सादर झाल्या. यातील आयो कहा से घनश्याम, सून मेरे बंधू आदी रचनांना टाळ्या व दाद मिळाली.