वैतरणा परिसरातील नागरिकांना दिलासा; अडीच फूट रुंद पुलाचे काम सुरू

अनेक वर्षांपासून वाढीव वैतरणा परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पादचारी पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे.  यासाठी पूल क्रमांक ९२ येथील अडीच फूट रुंद पादचारी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

वाढीव गावासाठी अन्य कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने या नागरिकांचा रेल्वे खाडी पुलावरून धोकादायक प्रवास सुरू होता. या प्रवासामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. या पुलावर ये-जा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती.

पश्चिम रेल्वेवरील विरारवरून डहाणूच्या दिशेने प्रवास करताना सुरुवातीलाच व वैतरणा स्थानक व वाढीव गाव परिसर आहे. या भागात मोठय़ा संख्येने नागरी वस्ती आहे. परंतु हे गाव बेटावर असल्याने याठिकाणी ये-जा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांचा धोकादायक रेल्वे पुलावरून प्रवास करावा लागत आहे मध्यंतरी एका ६० वर्षीय महिलेचा या पुलावरून पाण्यात पडून मृत्यू झाल्याची व एका इसमाचा लोकल अपघातामुळे मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या होत्या, तसेच याआधीसुद्धा या पुलावर अनेक दुर्घटना घडल्या असल्याने या सर्व घटना डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी रेल्वे व प्रशासनासमोर मांडण्यात आल्या होत्या.

तसेच या गावातील नागरिकांचे होणारे वाढते अपघात याला आळा बसावा यासाठी उपाययोजना म्हणून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे वरिष्ठ अधिकारी, पालघर जिल्हाधिकारी, मेरिटाइम बोर्ड, तसेच स्थानिक व अन्य लोकप्रतिनिधी यांना पत्रव्यवहार करून लवकरात लवकर या गावासाठी रस्ता उपलब्ध होण्याची मागणी करण्यात आली होती. याचा विचार करून नागरिकांना व रेल्वे कर्मचारी यांना सुरक्षित प्रवास करता यावा,  यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. पुलाच्या कामाला गती मिळावी यासाठी रेल्वे पुलाचे अभियंता व ठेकेदार यांची भेट घेऊन पुलाच्या कामाची तपासणी करण्यात आली आहे.

वैतरणा वाढीव परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गाची उपलब्धता करण्यात यावी यासाठी संस्थेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला होता, या मागणीनुसार या पादचारी पुलाची निर्मिती करण्यात येणार असल्याने याचा फायदा येथील ग्रामस्थांना होणार आहे. सतीश गावड, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था