गटारांवरील झाकणे गायब; पाणी साचल्यास दुर्घटना होण्याची भीती

मुंबईतील गोरेगाव परिसरात उघडय़ा गटारात पडल्याने दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाणे शहरातील पदपथांखालील गटारांच्या उघडय़ा झाकणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वागळे इस्टेट, रामचंद्र नगर, तीन हात नाका या भागांतील पदपथांवर असलेली गटारांची झाकणे गायब झाली आहेत. थोडय़ाशा पावसातही हे परिसर जलमय होत असल्यामुळे या उघडय़ा गटारांत नागरिक पडून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.

बॉम्बे रुग्णालयाचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा दोन वर्षांपूर्वी एल्फिन्स्टन परिसरातील उघडय़ा गटारात (मॅनहोल) पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर मुंबईसह सर्वच शहरांतील उघडय़ा मॅनहोलबद्दल आक्रोश निर्माण झाला. त्या वेळी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील उघडी गटारे तातडीने बंदिस्त करण्याचे आदेश दिले होते व त्यानुसार पदपथांवरील गटारांवर झाकणेही बसवण्यात आली. मात्र, त्यांची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने वागळे इस्टेट, तीन हात नाका, रामचंद्र नगर या परिसरांतील गटारांवरील झाकणे गायब झाली आहेत. अनेक झाकणे तुटलेल्या अवस्थेत, तर काही ठिकाणी झाकणांतील सळया वर निघाल्याने त्यात पाय अडकून पादचारी जखमी होण्याचे

प्रकारही घडत आहेत. या भागांत पावसाळय़ात पाणी साचल्यानंतर उघडय़ा गटारांचा अंदाजही बांधणे कठीण होऊन बसते. अशा वेळी पादचारी गटारात पडण्यासारखी दुर्घटना होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

धोक्याचे पदपथ

रोड नंबर २८

वागळे इस्टेट येथील रोड नंबर २८ परिसरातील हनुमान नगर, रामवाडी, इंदिरानगर परिसरातील १० ते १२ ठिकाणी पदपथावरील गटारांची झाकणे गायब झाली आहेत. ज्ञानेश्वर नगर येथील रस्त्याच्या मधोमध असलेले झाकण खचले आहे.

रामचंद्र नगर

रामचंद्र नगर येथील पदपथांचीही अशीच अवस्था आहे. येथील नागरिकांना चालताना त्याचा सामना करावा लागत आहे. गटारावरील झाकणे तुटलेली असल्याने त्यावर दगड ठेवण्यात आले आहेत.  मात्र, त्याचा फारसा उपयोग नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

तीन हात नाका

तीन हात नाका येथील सेवारस्त्यावरील पदपथावरून शेकडो नागरिक पाचपाखाडीच्या दिशेने ये-जा करतात. मात्र, या पदपथावरही धोकादायकरीत्या झाकणे उघडी आहेत. त्यामुळे येथून ये-जा करताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते.