अनेक महाविद्यालयांतील माजी विद्यार्थ्यांकडे एकांकिकांच्या दिग्दर्शनाची धुरा

संहिता कितीही ताकदवान असली तरी तिची मांडणी सशक्तपणे झाली तरच ती रसिकांच्या मनाला जाऊन भिडते. हे काम अर्थातच दिग्दर्शकाचे. कलाकारांकडून त्यांचा सर्वोत्तम अभिनय करून घेतानाच संहितेला पूर्ण न्याय देणे ही जबाबदारी दिग्दर्शकाची असते. त्यामुळेच ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी झालेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपल्याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकडे ही जबाबदारी सोपवली आहे. ‘लोकांकिका’च्या आधीच्या पर्वाचा अनुभव या विद्यार्थ्यांच्या निवडीमागचे मुख्य कारण आहे.

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मनीष साठय़े याचे ‘लोकांकिका’साठीच्या दिग्दर्शनाचे हे तिसरे वर्ष. ज्ञानसाधना महाविद्यालयासाठी २०११पासून विविध एकांकिकांसाठी काम करणाऱ्या मनीषने ‘लोकांकिका’ स्पर्धेत २०१६मध्ये ‘रात्रीस खेळ चाले’ आणि २०१७मध्ये ‘आरपार’ या महाविद्यालयाच्या एकांकिकांचे दिग्दर्शन केले आहे. ‘माजी विद्यार्थी नात्याने दिग्दर्शक म्हणून मिळालेली संधी ही माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. एकांकिकेतील कलाकार पोटतिडकीने मेहनत घेत असतात.

महाविद्यालयात असताना आम्हीही या काळातून गेलेलो आहे. त्यामुळे एका बाजूला माजी विद्यार्थी असताना दुसऱ्या बाजूला एकांकिकेचा दिग्दर्शक म्हणून भूमिका सांभाळणे हे सोपे जाते,’ असे तो म्हणाला. एकांकिकेसाठी देण्यात येणारे मानधनही एकांकिकेच्या कामासाठी वापरणार असल्याचेही त्याने सांगितले.

‘लोकसत्ता लोकांकिकेच्या प्रथम वर्षी सीएचएम महाविद्यालयातर्फे ‘मडवॉक’ नावाची एकांकिका केली होती. या एकांकिकेत स्वत: अभिनय केला होता. मात्र त्यानंतर दोन वर्षांनी महाविद्यालयाने एकांकिका करण्याची पुन्हा संधी दिली,’ असे ‘सीएचएम’चा माजी विद्यार्थी रोमारिओ काडरेझ याने सांगितले. ‘दिग्दर्शन करताना अनेक बाजू समर्थपणे पेलाव्या लागतात. हे करताना सध्या काम करत असलेल्या कलाकारांना दिग्दर्शनातील माझा अनुभव सांगण्याचे कामही मी करतो. जेणेकरून पुढील वर्षी त्यांच्यातील कोणीतरी दिग्दर्शनासाठी तयार होईल,’ असे रोमारिओ म्हणाला.

गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी नितेश डोंगरे याचादेखील असाच प्रयत्न आहे. ‘आजवर प्रेक्षकांत बसून ‘लोकसत्ता लोकांकिका’ आवर्जून पाहिली. त्यामुळे यंदा महाविद्यालयाने यात सहभागी झालेच पाहिजे, यासाठी प्रयत्न केले. यंदा ‘वाघोबा’ नावाची एकांकिका करत आहोत,’ असे नितेश म्हणाला. ‘लोकसत्ता लोकांकिका ही एक महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून दिग्दर्शन करत असताना गोवेलीसारख्या छोटय़ाशा गावातही अभिनय करण्याची ऊर्जा विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते,’ असे तो म्हणाला.

शहाड येथील मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेल्या सागरला महाविद्यालयातून एकांकिका करण्याची संधी मिळाली नाही. ‘बाहेरून एकांकिका करत होतो. मात्र, लोकसत्ता लोकांकिकामुळे महाविद्यालयासाठी एकांकिका करण्याची संधी मिळाली,’ असे तो म्हणाला. ‘आपण शिकलेल्या महाविद्यालयतही नाटकाची चांगली परंपरा तयार व्हावी यासाठी महाविद्यालयातर्फेच ‘हृदयशून्य’ ही एकांकिका करण्याचे ठरवले. महाविद्यालयाला एकांकिकेची ओळख व्हावी यासाठीच ही धडपड सुरू आहे,’ असे सागरने सांगितले.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.