पोलिसांच्या जाचाला कंटाळून झा बंधूंची आत्महत्या

विरार येथील दोन सख्ख्या भावांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी विरार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या विकास झा या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा भाऊ  अमित झा यानेही विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. पोलिसांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ त्याने आत्महत्येपूर्वी स्वत:ची चित्रफीत तयार करून आत्महत्या केली होती. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत अमितच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका झा बंधूंचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घेतली. यामुळे सोमवारी रात्री विरार शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे निर्माण झालेल्या तणावामुळे मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. अखेर रात्री दोन वाजता या घटनेला जबाबदार असलेले विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मयत तरुणांचे वडील विनयकांत झा यांच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतरच मयत अमितवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगळवारी सकाळी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मिथिलेश झा आणि अमर झा यांना अटक केली. मुनाफ बलोच याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल होता. तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विरारच्या पोलीस निरीक्षकांवर कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी डहाणूच्या उपअधीक्षकांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. अटक केलेल्या दोन आरोपींची या प्रकरणात नेमकी काय भूमिका होती ते तपासले जात असल्याचे सिंगे यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी कुणी दोषी आढळतील, त्या सर्वावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही सिंगे यांनी दिले.

आरोपांचा पोलिसांकडून इन्कार

पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी पोलिसांवर करण्यात आलेल्या काही आरोपांचा इन्कार केला आहे. ११ नोव्हेंबरला विकास झाचा मृत्यू झाला. त्याच्या चौकशीचा अहवाल १६ जानेवारीला आला. त्या वेळी मुनाफ बलोच दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला, असे सिंगे यांनी सांगितले. विरारच्या पोलीस निरीक्षकांचीही बदली करण्यात आली होती, असेही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

विकास झा (२२) या तरुणावर विरार पोलीस ठाण्यात आठ विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते. त्याला परिसरातील काही सामाजिक कार्यकर्ते त्रास देत होते, तसेच पोलीस त्याचा विविध कारणांमुळे छळ करीत होते, असा त्याचा आरोप होता. त्या छळाला कंटाळून विकासने ९ नोव्हेंबर रोजी वसईच्या

उपअधीक्षक कार्यालयात स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. दोन दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आपल्या भावाच्या मृत्यूला पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते जबाबदार आहेत, असा आरोप त्याचा भाऊ अमित झा याने केला होता. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नसल्याने अमितने शनिवारी विष प्राशन केले. रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.