धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार; घाबरुन न जाता तक्रार करण्याचे आवाहन

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : सध्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यंचे प्रमाण वाढले असून हॅकर्स तसेच सायबर भामटय़ांनी आता अश्लील संकेतस्थळाचा आधार घेतला आहे. अश्लील संकेतस्थळ बघत असताना वायरस सोडून संगणकातील डेटा हॅक केला जाऊ  लागला आहे. तसेच अश्लील संकेतस्थळ बघणाऱ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्यात येत आहे.

बरेच जण उत्सुकतेपोटी अश्लील संकेतस्थळांना भेटी देत असतात. त्याचे प्रमाण अधिक आहे. याचाच गैरफायदा आता हॅकर्स आणि सायबर भामटय़ांनी घेण्यास सुरुवात केली आहे. अश्लील संकेतस्थळे ही अनधिकृत असल्याने त्यावर कुणाचे नियंत्रण नसते. या संकेतस्थळांवर वेगवेगळी आकर्षित करणारे ऑप्शन्स असतात. त्याला क्लिक केल्यावर विशिष्ट व्हायरस तसेच Ransomware डाऊनलोड करून संगणकात सोडला जातो.

हे सुरू असताना मोबाइल किंवा लॅपटॉपचा कॅमेरा ऑन होतो आणि रेकॉर्डिग सुरू केली जाते. या व्हायरसच्या आधारे संगणकातील खासगी डेटा चोरला जातो. हे अश्लील संकेतस्थळ बघणाऱ्या व्यक्तीस मग सायबर भामटे फोन करून ब्लॅकमेल करतात. तुम्ही कुठले अश्लील संकेतस्थळ बघत होता, त्याची माहिती सार्वजनिक करून तुमची बदनामी करू अशी धमकी देऊन पैसे उकळतात. अश्लील संकेतस्थळे बघताना अशाप्रकारची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने खबरदारी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

जर कोणत्याही व्यक्तीस अशा प्रकारचे संदेश किंवा कॉल्स आले तर घाबरून न जाता पोलिसात तक्रार करावी, असे आवाहन राज्याचे सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक भालसिंग राजपूत यांनी केले आहे.

आतापर्यंत ५०७ सायबर गुन्हे दाखल

२८ जूनपर्यंत राज्यात ५०७ सायबर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. २६२ आरोपींना अटक केली आहे. यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात (takedown) यश आले आहे. आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९६ गुन्हे, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी, tiktok व्हिडीओ शेअरप्रकरणी २७ ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी १० गुन्हे दाखल झाले आहेत, तर इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्याप्रकरणी ५९ गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली आहे.