कंत्राटदार मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनाचा निर्णय; एकाचवेळी बाराशे दुचाकी उभ्या करण्याची सोय

किशोर कोकणे, ठाणे</strong>

ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेला असलेल्या वाहनतळातील पहिल्या मजल्यावरील वाहनतळ दुचाकी चालकांना वाहन उभे करण्यासाठी विनाशुल्क खुले केले जाणार आहे. पहिल्या मजल्याचे वाहनतळ तयार होऊन सहा महिने उलटले आहेत. हे वाहनतळ चालविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मागविलेल्या निविदेला ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची वाहने उभी करता यावी यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला दुमजली वाहनतळ तयार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. या कामासाठी सुमारे १७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र, २०१५पासून तीन वर्षे हे काम विविध कारणांमुळे रखडले होते. या कामासाठी तरतूद केलेला निधीही संपला. अखेर नव्याने निधी मिळाल्यानंतर दीड वर्षांपूर्वी वाहनतळ उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या वाहनतळातील तळमजल्याचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने पहिल्या मजल्याचे कामही वेगाने पूर्ण केले. त्यामुळे ठाणे स्थानक परिसरातील पार्किंगची मोठी समस्या सुटेल, अशी चिन्हे निर्माण झाली होती. या पहिल्या मजल्यावरील वाहनतळाच्या कंत्राटासाठी रेल्वे प्रशासनाने वार्षिक १ कोटी रुपयांची निविदा काढली होती. मात्र, या निविदेसाठी एकही कंत्राटदार पुढे येत नव्हते. वाहन चालकांची गैरसोय होऊ लागल्याने अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने पहिल्या मजल्यावरील वाहनतळ विनाशुल्क खुले करून देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानक परिसरात बेकायदा वाहने उभी केली जातात. या निर्णयामुळे आता बेकायदा पार्किंगला आळा बसण्याची शक्यता आहे.

ठाणे स्थानकातील वाहनतळ प्रकल्प

* २०१५ मध्ये मान्यता

*  तरतूद झालेला निधी रेल्वेकडून वेगळय़ाच कामांवर खर्च

*  नव्याने निधी आल्यानंतर दीड वर्षांपूर्वी वाहनतळाची निर्मिती

*  १५०० चौरस मीटर जागेत वाहनतळ

*  तळमजला आणि पहिल्या मजल्यावर एकूण १२०० ते १३०० वाहने एकाच वेळी उभी राहू शकतात.

*  दुसऱ्या मजल्याचे काम पूर्ण झाल्यावर दोन हजार दुचाकी उभ्या करण्याची क्षमता.