पहिली यादी ८० टक्क्यांच्या घरात
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी जाहीर झाली. मुंबईच्या महाविद्यालयांच्या तुलनेत ठाण्यातील महाविद्यालयांची पहिल्या गुणवत्ता यादीची टक्केवारी घसरल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील महाविद्यालयांच्या पहिली यादीने ९० टक्क्य़ांचा टप्पा गाठलेला असताना त्या तुलनेत ठाण्यातील नामांकित महाविद्यालयांची पहिली यादी ८० टक्क्य़ांच्या आसपास स्थिरावली आहे. त्यामुळे अजूनही ठाण्यातील विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील महाविद्यालयांचे आकर्षण कायम असल्याचे दिसून येते. बॅफ, बीबीआय, बीएमएस, बीएमएम यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची टक्केवारी गेल्या वर्षीप्रमाणेच आहे. दुसरी गुणवत्ता यादी २९ जून रोजी तर तिसरी १ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ठाण्यातील बहुतेक सर्व महाविद्यालयांनी कलाशाखेतील प्रवेश सर्वासाठी खुले केले आहेत. मात्र जोशी-बेडेकर महाविद्यालय त्यास अपवाद आहे.

विद्यार्थी-पालकांच्या मनात अजूनही मुंबईतील काही नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्याची धडपड सुरू असते. ठाण्यातही चांगली महाविद्यालये आहेत. त्यात आता आणखी काही नव्या महाविद्यालयांची भर पडत आहे. त्यामुळे काही वर्षांनंतर मुंबईचे आकर्षण कमी होत जाईल.
-डॉ.शकुंतला सिंग, प्राचार्या, जोशी-बेडेकर महाविद्यालय