पाइपद्वारे गॅस मिळावा यासाठी वर्षांनुवर्षे प्रतीक्षा करणाऱ्या डोंबिवलीकरांचे स्वप्न येत्या डिसेंबरअखेरीस पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महानगर गॅस कंपनीने पहिल्या टप्प्यात ५०० नागरी वसाहती आणि ३५० खासगी बंगल्यांना पाइपद्वारे गॅस पुरविण्याची योजना आखली आहे. विस्तारित डोंबिवली अशी ओळख असणाऱ्या मिलापनगर, सुदर्शननगर, सुदामानगर परिसरात ही योजना सुरू करून दुसऱ्या टप्प्यात जुन्या डोंबिवलीकडे मोर्चा वळविला जाईल.

विस्तारित डोंबिवली अशी ओळख असलेल्या औद्योगिक पट्टय़ालगत वसलेल्या नागरी पट्टय़ात गॅसवाहिनी टाकण्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून केवळ ३०० मीटरचे काम शिल्लक राहिले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यानंतर निवासी विभागातील घरांमध्ये वाहिनीद्वारे गॅसपुरवठा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे कंपनीचे व्यवस्थापक संतोष सामंत यांनी स्पष्ट केले. पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांनाही त्रास सहन करावा लागू नये यासाठी अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने केवळ वाहिनी टाकण्यासाठी आवश्यक तेवढाच रस्ता खोदण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

विस्तारित डोंबिवलीत भूमिगत गॅसवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होताच वसाहतींच्या मागणीप्रमाणे अंतर्गत वाहिन्या टाकण्याची कामे उरकली जातील, असे सामंत यांनी स्पष्ट केले. औद्योगिक विभागातील घरोघरी गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम काही ठिकाणी दोन महिन्यांपासून सुरू आहे. मुख्य मोठय़ा वाहिनीचे ३०० मीटरचे काम शिल्लक असून येत्या काही दिवसांत ते पूर्ण होईल. त्यामुळे डिसेंबरअखेरीस पाइपद्वारे गॅस मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ५०० वसाहतींना पहिल्या टप्प्यात गॅसपुरवठा करण्याची योजना असून प्रयोगिक तत्त्वावर हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.