डॉ. प्रदीप गाडगे, मधुमेहतज्ज्ञ

‘जेस्टेशनल डायबेटिस’ गरोदरपणात होतो. याचा अर्थ गरोदरपणात स्त्रीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. पण गरोदर राहण्यापूर्वी तिला मधुमेह नसतो. जेस्टेशनल डायबेटिस हा मधुमेहाचा सर्वाधिक वेगाने वाढणारा प्रकार आहे. जेस्टेशनल डायबेटिस म्हणजे केवळ गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी वाढते ती अवस्था होय. बाळाला जन्म दिल्यानंतर बहुतेकदा हा मधुमेह राहत नाही. गरोदरपणात स्त्रीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवणारी संप्रेरके निर्माण होतात. सहसा गरोदर स्त्रीचे स्वादुपिंड या अतिरिक्त साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक तेवढे इन्शुलीन निर्माण करते. मात्र, स्वादुपिंडाने पुरेसे इन्शुलीन निर्माण केले नाही, तर रक्तातील साखरेची पातळी वाढलेली राहते आणि जेस्टेशनल डायबेटिस होतो.

जेस्टेशनल डायबेटिस सहसा गर्भावस्थेच्या दुसऱ्या टप्प्यात (दुसऱ्या तिमाहीत) होतो. गरोदर स्त्रीला जेस्टेशनल डायबेटिस झाला आहे का, याची तपासणी स्त्रीरोगतज्ज्ञ गरोदरपणाच्या २४व्या ते २८व्या आठवडय़ादरम्यान करतात. स्त्रीला मधुमेहाचा धोका अधिक असेल तर डॉक्टर यापूर्वीही चाचणी करवून घेऊ  शकतात. गरोदरपणात कोणत्याही स्त्रीला जेस्टेशनल डायबेटिस होऊ  शकतो.

या परिस्थितीत स्त्रियांना हा धोका अधिक असतो बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ३०हून अधिक असेल तर यापूर्वीच्या गरोदरपणात जेस्टेशनल डायबेटिस झाला असेल तरआई-वडिलांपैकी एकाला किंवा भावंडांना मधुमेह असेल तर वय ३५ वर्षांहून अधिक असेल तर पॉलीसिस्टिक ओव्हरिअन सिंड्रोम (पीसीओएस) असेल तर जेस्टेशनल डायबेटिस असलेल्या स्त्रियांमध्ये सहसा काही लक्षणे आढळत नाहीत. गरोदरपणात केल्या जाणाऱ्या नेहमीच्या चाचण्यांतूनच बहुतेकींना हे कळते. ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (ओजीटीटी) करून जेस्टेशनल डायबेटिसचे निदान केले जाते. जेस्टेशनल डायबेटिसची चाचणी करण्यासाठी स्त्रीला साखरयुक्त/ ग्लुकोजयुक्त पाणी प्यावे लागते. यामुळे स्त्रीच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. एक तासानंतर रक्ताची चाचणी करून वाढलेल्या साखरेच्या पातळीचा सामना तिच्या शरीराने कसा केला हे तपासले जाते. जर रक्तातील साखरेचे प्रमाण विशिष्ट मर्यादेहून अधिक (१३० मिलिग्रॅम/डीएल किंवा अधिक) आहे असे लक्षात आल्यास स्त्रीला एचबीएवनसी ही तीन महिन्यांतील सरासरी साखर तपासणारी चाचणी करवून घेण्यास सांगितले जाते.

जेस्टेशनल डायबेटिस असलेल्या बहुतेक स्त्रिया निरोगी बाळांना जन्म देतात. मात्र, जेस्टेशनल डायबेटिसचे व्यवस्थापन काळजीपूर्वक केले नाही, तर रक्तातील साखरेची पातळी अमर्याद वाढू शकते आणि त्यातून आई व बाळ दोघांसाठी समस्या निर्माण होतात. गरोदर स्त्रीला जेस्टेशनल डायबेटिस असेल, तर तिच्या बाळाला काही धोके संभवतात. जन्मत: अतिरिक्त वजन, मुदतपूर्व जन्म आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, उच्च रक्तदाब (प्रीक्लॅम्पशिया) आदी विकार होऊ शकतात.

जेस्टेशनल डायबेटिस असलेल्या स्त्रियांनी वारंवार रक्तातील साखर तपासणे आवश्यक असते. म्हणजे डॉक्टर त्यांना योग्य पातळी राखण्याबद्दल आणि गरोदरपणात डायबेटिसचे व्यवस्थापन करण्याबद्दल सल्ला देऊ  शकतात. रक्तातील साखरेवर गरोदरपणाचा परिणाम होतोच, गरोदर स्त्री काय खाते-पिते, ती किती व्यायाम करते यावर ही पातळी अवलंबून असते. तिच्या आहारात बदल सुचवले जाऊ  शकतात किंवा तिला आणखी क्रियाशील राहण्याचा सल्ला दिला जातो. तिला इन्शुलीन किंवा औषधेही दिली जाऊ  शकतात.

जेस्टेशनल डायबेटिस नसलेल्या गरोदर स्त्रीच्या रक्तातील साखरेची पातळी जेवढी असेल, तेवढीच पातळी जेस्टेशनल डायबेटिस असलेल्या स्त्रीची राहावी यासाठी उपचार केले जातात. गरोदरपणात जेस्टेशनल डायबेटिस झालेल्या स्त्रियांना काही उद्दिष्टे निश्चित करून दिली जातात.

जेस्टेशनल डायबेटिस बहुतेकदा निरोगी आहार आणि नियमित शारीरिक व्यायामाच्या मदतीने आटोक्यात राखता येतो. मात्र, काही स्त्रियांना औषधे (मेटफोर्मिन) किंवा इन्शुलीन इंजेक्शन्स देऊन हा मधुमेह नियंत्रणात ठेवावा लागतो. जेस्टेशनल डायबेटिस आटोक्यात ठेवण्यासाठी संबंधित स्त्रीला दररोज तीन वेळा नियमित जेवण घ्यावे लागते तर दोन ते तीन वेळा हलका आहार घ्यावा लागतो. रात्री एकदा जेवावे लागते. आरोग्यपूर्ण आहाराच्या नियोजनात आहारतज्ज्ञ मदत करू शकतात. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे व्यायाम. व्यायाम आहाराला पूरक ठरतो. नियमित व्यायाम केल्यास तुमच्या शरीरातील साखर अतिरिक्त इन्शुलीनशिवाय वापरली जाते. यामुळे इन्शुलीन रेझिस्टन्सचा सामना करण्यातही व्यायाम उपयुक्त ठरतो. म्हणूनच मधुमेहींनी व्यायाम नियमित करणे आवश्यक असते. मात्र, डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणताही व्यायाम सुरू करू नका. डॉक्टरांना विचारून तुम्ही नियमित व्यायाम करू शकता आणि गरोदरपणानंतरही तो सुरू ठेवू शकता.