News Flash

नव्या वर्षांत ठाण्यात झटपट पारपत्र

आसपासच्या शहरांमध्ये दोन वर्षांपूर्वी पारपत्र कागदपत्र पडताळणी प्रक्रिया मानवी पद्धतीने हाताळली जात असे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रहिवाशांना अधिक वेगाने पारपत्र (पासपोर्ट) मिळावे यासाठी मुंबईच्या धर्तीवर आता ठाण्यातही वेगवान पारपत्र योजना राबवली जाणार आहे.

* पोलीस-पारपत्र विभागाकडून नवी यंत्रणा  ; * २१ दिवसांत पारपत्र मिळणार नीलेश पानमंद
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रहिवाशांना अधिक वेगाने पारपत्र (पासपोर्ट) मिळावे यासाठी मुंबईच्या धर्तीवर आता ठाण्यातही वेगवान पारपत्र योजना राबवली जाणार आहे. या नव्या योजनेनुसार पारपत्र कार्यालयातून स्थानिक पोलीस ठाण्यात ऑनलाइन यंत्रणेद्वारे पडताळणीसाठी कागदपत्रे पाठविण्यात येणार आहेत. यापूर्वी पारपत्र कार्यालयातून ही कागदपत्रे आयुक्तालयात पाठविली जात असत. त्यानंतर आयुक्त कार्यालयातून फेरपडताळणीसाठी ती स्थानिक पोलीस ठाण्यात पाठवून पुन्हा आयुक्त कार्यालयात येत असत. या प्रक्रियेत तब्बल १० ते १५ दिवसांचा अतिरिक्त वेळ खर्च होत असे. हा वेळ वाचविण्यासाठी आता मुंबईच्या धर्तीवर पारपत्र कार्यालयातून थेट स्थानिक पोलिसांकडे पडताळणी कागदपत्रे जाऊ शकतील. येत्या काही दिवसांत ही यंत्रणा प्रत्यक्षात राबविण्यासाठी पावले उचलली जात असून यामुळे अवघ्या २१ दिवसांत पारपत्र मिळू शकेल, असा दावा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘ठाणे लोकसत्ता’सोबत बोलताना केला.
ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये दोन वर्षांपूर्वी पारपत्र कागदपत्र पडताळणी प्रक्रिया मानवी पद्धतीने हाताळली जात असे. त्यामुळे नागरिकांना पारपत्र मिळविण्यासाठी बराच कालावधी लागत होता. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी पारपत्रासाठी ऑनलाइन यंत्रणा कार्यान्वित केली. त्यानुसार कागदपत्रे पडताळणीसाठी पारपत्र कार्यालय ते आयुक्तालय आणि आयुक्तालय ते संबंधित पोलिस ठाणे आणि त्यानंतर पुन्हा उलट प्रवास होत असे. या प्रक्रियेनुसार सुमारे ४१ दिवसांत नागरिकांना पारपत्र मिळत असे. हा कालावधी कमी व्हावा यासाठी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गुन्हे आढावा बैठकीत कागदपत्र पडताळणी वेगाने व्हावी यासंबंधी विशेष सूचना दिल्या. त्यानंतर ४१ दिवसांचा कालावधी आता ३० दिवसांपर्यत येऊन पोहचला आहे, अशी पारपत्र विभागाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक सीमा अडनाईक यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली.
पूर्वीपेक्षा पारपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीचा प्रवास वेगाने होत असला तरी तो समाधानकारक नसल्याच्या तक्रारी काही भागातून येत होत्या. त्यामुळे ठाणे पोलिसांनी पारपत्र प्रक्रियेचा कालावधी आणखी कमी करण्याचा विचार सुरू केला असून त्यासाठी आयुक्तालयातील पारपत्र विभागाला मुंबईच्या धर्तीवर ही योजना राबविता येईल का यासंबंधीची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पारपत्र विभागाशी समन्वय साधला जात आहे. अर्जदाराने पारपत्रासाठी संबंधित कार्यालयात अर्ज केल्यास अर्जदाराची कागदपत्रे पडताळणीसाठी यापूर्वी आयुक्तालयात पाठविले जात असत. यापुढे ते थेट स्थानिक पोलीस ठाण्यात पाठविण्याची यंत्रणा विकसित केली जात आहे. त्यामुळे आयुक्तालयात दोन वेळा येत असलेली कागदपत्रे एकदाच येतील आणि त्यामुळे तब्बल १० ते १५ दिवसांचा कालावधी कमी होईल, असा दावा पोलीस आयुक्तांनी केला. ही यंत्रणा विकसित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू झाली असून पारपत्र विभागाकडून पूर्ण सहकार्य दिले जात आहे, असा दावाही केला जात आहे. नव्या वर्षांत ही यंत्रणा निश्चितच अमलात आलेली असेल, असा दावाही आयुक्तांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2015 3:02 am

Web Title: get instant passport thane
Next Stories
1 ठाणे स्थानकातील वाहनतळाच्या कामाला अखेर सुरुवात
2 नीरव शांततेचा ‘वन’वास
3 एकमेका साहय़ करू
Just Now!
X