मुंबईतील पश्चिम उपनगरांसह ठाण्याहून गुजरातच्या दिशेने जाणारा हमरस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर गेल्या दोन वर्षांत वाहनांची संख्या जवळपास तिप्पटीने वाढली आहे. मात्र, या वाहनांना सामावून घेणारा रस्ता मात्र, नियोजनाअभावी अपुरा पडू लागला आहे. नवश्रीमंतीची झालर मिरविणाऱ्या या रस्त्याला गुजरातच्या दिशेने येजा करणाऱ्या अवजड वाहनांनी गिळंकृत केले आहे. त्यामुळे लाखो रुपये मोजून घोडबंदर रस्त्यालगतच्या परिसरात वास्तव्यास आलेल्या नागरिकांना पाच किमीचे अंतर कापण्यासाठी तासभर वेळ मोजावा लागत आहे.

दोन्ही बाजूंना तब्बल आठ  पदरी असलेल्या या मार्गाचे ठाणेकरांना एकेकाळी कौतुक असायचे. हा संपूर्ण मार्ग मुंबई, ठाण्यातील बडय़ा बिल्डरांच्या केंद्रस्थानी येऊ लागताच महापालिका आणि राज्य सरकारने या ठिकाणी तीन उड्डाणपुलांची आखणी केली. येथील मुख्य मार्गावरून वेगवेगळ्या भागात जाणे सोयीचे ठरावे यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करुन सेवा रस्तेही बांधण्यात आले. एवढे सगळे करूनही येथे उभी राहणारी मोठी संकुले, वाढती लोकसंख्या, वाहनांचा भार यामुळे गर्दीच्या वेळेत या मार्गावरील वाहतुकीचे नियोजन कोलमडू लागले आहे.

जास्त वर्दळीची कारणे

* स्थानिकांच्या वाहतुकीसाठी मुंबई-अहमदाबाद हा एकच मार्ग

* खासगी वाहने मुंबई-नाशिक महामार्गावरून दररोज मुंबईत कामानिमित्त वाहतूक करतात.

* उरण येथील जेएनपीटी बंदरातील अवजड वाहने घोडबंदरमार्गे मुंबई आणि गुजरात राज्यात येजा करतात.

* मुंबईतील पश्चिम उपनगरांना ठाण्याशी जोडणारा हा महत्त्वाचा आणि सोयीचा मार्ग आहे. त्यामुळे अंधरी ते बोरिवली अशा उपनगरांमध्ये कामासाठी जाणाऱ्यांच्या वाहनांचीही वर्दळ.

पर्यायी नियोजन कागदावरच

* गायमुख ते बाळकुम खाडी किनारी रस्ता

* श्रीनगर ते गायमुख रस्ता

* टिकुजिनीवाडी ते बोरिवली भुयारी मार्ग

* खाडीमार्गे जलवाहतूक

मेट्रोच्या बांधकामाचे आव्हान

घोडबंदर मार्गावर मेट्रोची उभारणी करण्यात येत आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळेल, असे दावे असले तरी येत्या एक ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होताच घोडबंदरचे दुखणे नकोसे होईल, अशी प्रवाशांना भीती आहे.