News Flash

शाळेच्या बाकावरून : ध्येयप्रेरित शिक्षक

स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘शिक्षणाने वैयक्तिक उन्नती साध्य होते,

स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘शिक्षणाने वैयक्तिक उन्नती साध्य होते, पण समाजातल्या (आणि विशेषत:) तळागाळातल्या सामान्यांकडे बघण्याची दृष्टी निर्माण होते.’ स्वामी विवेकानंदांच्या या विचारांमागे व्यापक अर्थ आहे. शैक्षणिक स्तरावर यश साध्य करताना आपला उत्कर्ष होत असतो. पण त्याचबरोबर समाजातल्या संघर्षमय जीवन जगणाऱ्या, मूलभूत किंवा जीवनावश्यक गोष्टींसाठी झगडणाऱ्या लोकांसाठी आपण आपल्यापरीने करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणतात. ठाण्यातील राजा शिवाजी विद्यामंदिर शाळेचे संस्थापक सदाशिव देवकर यांना भेटल्यावर, त्यांच्या कार्याची व्याप्ती पाहिल्यावर आपण अक्षरश: भारावून जातो. स्वामीजींना जे अपेक्षित होते ते आपण देवकर सरांनी केलेल्या कार्याच्या स्वरूपात प्रत्यक्ष पाहतो, अनुभवतो. लोकमान्यनगर परिसरातील कष्टकरी बांधवांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शाळा काढण्याचे ध्येय देवकरसरांनी डोळ्यासमोर ठेवले. स्वत:चा संसार, मुलेबाळे कशाचाही विचार न करता सर्वस्व पणाला लावून देवकरसरांनी अक्षरश: शून्यातून शाळा उभी केली. या परिसरातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील लोकांच्या जीवनावर देवकरसरांनी आशेची ज्योत निर्माण केली.
देवकरसर स्वत: भांडूपमधील नवजीवन विद्यालयात शिक्षक होते आणि सुरुवातीपासूनच समाजातील कष्टकरी वर्गातील मुलांच्या शिक्षणविषयक समस्येमुळे ते अस्वस्थ व्हायचे. आपण या मुलांसाठी शाळा काढायला हवी, असे त्यांना प्रकर्षांने वाटत होते आणि अखेर ते त्यांच्या आयुष्याचे उद्दिष्ट ठरले. स्वत:वर संसाराची जबाबदारी होती आणि हाती पैसा नव्हता त्यामुळे शाळा काढणे सोपे नव्हते. त्यांना कालांतराने लोकमान्यनगर परिसरात अगदी डोंगराच्या पायथ्याशी एक जागा मिळाली. आज तिथे राजा शिवाजी विद्यामंदिर शाळा आहे. तिथे पूर्वी ओसाड माळरान होते, असे जेव्हा कळते तेव्हा प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर ध्येयप्रेरित व्यक्ती असाध्य ते साध्य करून दाखवतात याची प्रचीती येते. जागा मिळाली पण आवश्यक तेवढे पैसे नव्हते. या टप्प्यावर पत्नी रंजना देवकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यांनी स्वत:चे दागिने विकले आणि शाळेसाठी पैसे देऊ केले. देवकरसरांनी स्वत: दररोज घाम गाळून, स्वकष्टाने त्या ओसाड माळरानावर दोन वर्ग बांधले. पहाटे उठून शाळा बांधायचे काम करायचे आणि मग स्वत:च्या शाळेत जाण्याचा कष्टप्रद दिनक्रम सरांनी अंगीकारला होता. आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांचे सहकार्य प्राप्त करणे, शाळेचे महत्त्व पटवून देणे, शाळा उभी करण्यासाठी आर्थिक तरतूद करणे, शाळेची मान्यता मिळवणे हे अडथळे पार करत त्यांनी यश मिळविले. काही घटक त्यात अडथळे आणू पाहत तेव्हा त्यांना खंबीरपणे सामोरे जायचे आणि नेटाने कार्य करायचे ही कला देवकरसरांनी साध्य केली होती. १९८१ साली राजा शिवाजी विद्यामंदिर पूर्वप्राथमिक शाळेच्या माध्यमातून देवकर पती-पत्नींनी आपल्या शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला. या परिसरातील लोक कष्टकरी वर्गातील. कुणी मजूर, कुणी कामगार, कुणी रिक्षाचालक आणि बऱ्याचशा स्त्रिया पापड लाटण्याचे काम करतात. ८वी ते १०वीची मुले घेऊन सुरुवात झालेल्या या शाळेत २५०० मुले शिक्षण घेत आहेत. सध्या राजा शिवाजी विद्यामंदिर पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि आर. एस. देवकर इंग्रजी माध्यम अशा शाळा आहेत. एका छोटय़ाशा रोपटय़ाचा अशा तऱ्हेने वटवृक्ष झाला आहे. अगदी प्रारंभीच्या काळात शाळेत यायला चांगला रस्ता नव्हता आणि माळरानावरील पाऊलवाटेवरून (बस स्टॉपपासून एक किमी) चालत यावे लागे. पण तरीही शिक्षक येत असत आणि अनुदान मिळेपर्यंत अल्पशा वेतनावर शिकवत असत. येथील प्रत्येक व्यक्ती या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी तळमळीने प्रयत्न करते, हे प्रकर्षांने जाणवते.
मराठी, इंग्रजी शाळांच्या सर्व विभागातील विद्यार्थी गेली चार वर्षे ई-लर्निगच्या माध्यमातून शिक्षणाचा नवीन अनुभव घेत आहेत. शिशू विभागातील शिक्षण कृतियुक्त शिक्षणपद्धतीने करून विद्यार्थ्यांचा उत्तम पाया तयार करण्यास प्राधान्य दिले जाते. या शाळेतील विद्यार्थ्यांना सुस्थितीतल्या विद्यार्थ्यांप्रमाणे पोषक वातावरणाचा लाभ घेता येत नाही, हे वास्तव लक्षात घेऊन त्यांचा सर्वागीण विकास होण्याच्या दृष्टीने शाळा तळमळीने प्रयत्न करते. सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन पद्धत परिणामकारकरीत्या अवलंबताना इ.१लीपासूनच त्या इयत्तेच्या दृष्टीने आवश्यक त्या क्षमतांचा विकास करण्यास प्राधान्य दिले जाते. सुट्टीत गरज जाणवल्यास पूरक अभ्यास करून घेतला जातो. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर पुन्हा आठ दिवस शिक्षक तयारी करून घेतात आणि एक चाचणी घेतात. कोणताही विद्यार्थी कच्चा राहू नये यासाठी शाळा प्रयत्नशील असते आणि म्हणूनच प्राथमिक वर्गापासूनच प्रत्येक इयत्तेकडे लक्ष दिले जाते.
या शाळेत येणारे बहुसंख्य विद्यार्थी कष्टकरी वर्गातील असल्याने त्यापैकी आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या निवडक विद्यार्थ्यांना शाळा दत्तक घेते. या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शाळा केवळ १०वीपर्यंतच नव्हे तर महाविद्यालयात गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहते आणि सर्वतोपरी साहाय्य करण्याचा प्रयत्न करते. २००१ पासून माध्यमिक शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. काळाची गरज लक्षात घेऊन पालकांची मागणी विचारात घेऊन आर. एस. देवकर इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्यात आली असून, पुढच्या वर्षी त्यांची इ.१०वीची पहिली बॅच असेल. या शाळांमधील इ.४थी ते ९वीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन शाळेतच दिले जाते. खेळ हा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अंग आहे. या शाळेत क्रिकेट, बुद्धिबळ, खोखो, कराटे इ.खेळांचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांतर्फेच दिले जाते.
शासनाचा महिला बालविकास विभाग व एक खासगी संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने आयआयटीमध्ये प्रवेश परीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले जाते. या उपक्रमात निवड होण्यासाठी एक स्वतंत्र परीक्षा द्यावी लागते. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, अशा विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी निवडले जाते. गेल्या वर्षी या शाळेच्या दोन विद्यार्थिनी आणि यंदा चार विद्यार्थिनी निवडल्या गेल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून मोजक्या विद्यार्थिनींची निवड केली जात असल्याने या शाळेचे यश विशेष उल्लेखनीय ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 8:15 am

Web Title: goal setting teacher inspired
टॅग : Teacher
Next Stories
1 ठाणे शहरबात : विकासाला विसंवादाचे ग्रहण
2 ठाणे.. काल, आज, उद्या
3 पाऊसपक्षी : धनेशची ‘डरकाळी’
Just Now!
X