28 January 2021

News Flash

ग्रास डेमन; फुलपाखरांच्या जगात

ग्रास डेमन हे हेस्पिरिडे कुळातील म्हणजेच ज्यांना स्किपर म्हटले जाते.

ग्रास डेमन

पावसाळ्यात आणि नंतरही हळद, रानहळद, सोनटक्का आणि त्यांची जंगली भाऊबंद झुडपे सगळीकडे पाहायला मिळतात. या झाडांच्या काही पानांची सुरळी झालेली दिसते, ते पान सरळही करता येत नाही. कारण त्याला रेशमी धाग्यांनी चिकटवून टाकलेले असते. त्याच्या आतमध्ये ग्रास डेमन फुलपाखराचा सुरवंट लपलेला असतो. हा सुरवंट याच झाडाची पाने खाऊन मोठा होतो.

ग्रास डेमन हे हेस्पिरिडे कुळातील म्हणजेच ज्यांना स्किपर म्हटले जाते अशा फुलपाखरांपैकी एक लहानसे फुलपाखरू आहे. जवळपास संपूर्ण भारतात हे सापडतेच, शिवाय शेजारील सर्व देशांमध्ये आणि सिंगापूरपर्यंतच्या प्रदेशात आढळते. हे फुलपाखरू गडद करडय़ा किंवा काळसर रंगाचे असते. याच्या मागच्या पंखांच्या वरच्या भागात मोठा पांढरा पण विस्कळीत असा ठिपका असतो तर पुढच्या पंखांवर मध्यभागी लहान लहान पांढरे ठिपके असतात. या रंगसंगतीचा उपयोग त्यांना स्वसंरक्षणासाठी होतो. ही फुलपाखरे जंगलांमधील मोकळे भाग किंवा जंगलालगतचे भाग यात वाढणाऱ्या झुडपांच्या सावलीत फिरतात, या वातावरणांत ते बेमालूम मिसळतात.

या फुलपाखरांची मादी हळद, आले या पिकांच्या पानांवर तसेच बागांमध्ये मुद्दाम लावल्या जाणाऱ्या सोनटक्का आणि तत्सम झुडपांवर, जंगलांमधील रानहळद म्हणजेच गौरीच्या फुलांच्या झाडांवर साधारणत: जून-जुलैमध्ये अंडी घालते, बाहेर येणारा सुरवंट आकाराने लहान असेपर्यंत अंडय़ाच्या कवचातच लपून राहतो. पुढे त्यात मावेनासा झाला की आपल्या शरीरातून निघणाऱ्या रेशमी धाग्याचा वापर करून तयार केलेल्या पानाच्या सुरळीसारख्या लपणात बसतो.

हा फक्त रात्री आपले खाण्याचे काम करतो आणि भक्षकापासून वाचतो. साधारणत: सप्टेंबर-आक्टोबरमध्ये हे कोषात जातात ही अवस्था चांगली ५/६ महिने टिकते. मार्चमध्ये प्रौढ फुलपाखरू बाहेर येते. अंडी, अळी, कोष या तीनही अवस्था प्रतिकूल वातावरणात सुप्तावस्थेत जाऊ  शकतात आणि हवामान अनुकूल झाले की मगच आपल्या जीवनक्रमात मार्गस्थ होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2016 3:20 am

Web Title: grass demon butterfly
Next Stories
1 अंबरनाथ, डोंबिवली प्रदूषणाच्या विळख्यात
2 कल्पकता, आधुनिकतेचा आविष्कार
3 जरा अदबीने बोला..दळण आणि ‘वळण’
Just Now!
X