शालीवाहन शके १९४० या हिंदू नववर्षांच्या स्वागतासाठी वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहर सज्ज झाले असून चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागतयात्रांतून नववर्षांचा जल्लोष साजरा होणार आहे. एकापेक्षा अधिक ठिकाणी उद्या, रविवारी स्वागतयात्रा काढण्यात येणार असून त्याद्वारे मराठी संस्कृतीचे दर्शनही घडणार आहे. पण स्वागतयात्रा म्हणजे केवळ संस्कृतीचे दर्शन एवढेच समीकरण आता उरलेले नाही. यापुढे जात या मिरवणुकांमधून सामाजिक जागृतीचे भानही जपण्यात येते. या पाश्र्वभूमीवर ठाणे पट्टय़ातील वैशिष्टय़पूर्ण स्वागतयात्रांचा घेतलेला हा आढावा.

हिंदू संस्कृती जागृती मंडळ, कामण

या मंडळाच्या माध्यमातून कामण येथे स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पर्यावरण व नागरी स्वच्छतेचा संदर्भ घेत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी महिला, पुरुष, लहान मुले पारंपरिक वेशभूषा करत सामील होणार आहेत. सजावटीचा रथ, लेझीम पथक, ढोल ताशांचा गजर यावेळी असणार आहे. यावेळी मंदिर आणि प्रत्येक घरासमोर गुढी उभारून रांगोळी काढण्यात येणार आहे.

आमची वसई संस्था, वसई

नववर्षांचे स्वागत करण्यासाठी विरार ते वसई किल्ला स्वागतयात्रेचे आयोजन ‘आमची वसई’ने केले आहे. यावेळी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. ढोल ताशांचा गजर करत किल्लय़ात गुढी उभारण्यात येणार आहे. श्रीराम मंदिर, बोळींज ते वसई किल्ला, श्री काशीविश्वेश्वर मंदिर गोखिवरे ते किल्ला आणि श्री वाल्मिकेश्वर मंदिर नायगाव ते किल्ला अशा तीन स्वागतयात्रा काढण्यात येणार आहेत.

देवस्थान निधी मंडळ, रुद्रध्वज प्रतिष्ठान, आगाशी

संध्याकाळी चार वाजता ही स्वागतयात्रा निघेल. भवानी शंकर मंदिराच्या प्रांगणातून निघणारी ही स्वागतयात्रा कवळीनाका, भंडार वाडा आणि पुन्हा भवानी शंकर मंदिर अशी असेल. ढोल-ताशा वादन, बाईक रॅली, तलवारबाजी, दांडपट्टा इत्यादी खेळ आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाचा मागोवा हे या स्वागतयात्रेचे वैशिष्टय़ आहे.

नववर्ष स्वागतयात्रा समिती, वसई

गुढीपाडवानिमित्ताने रामवाडी येथील ‘नववर्ष स्वागत यात्रा समिती’तर्फे स्वागतयात्रा आयोजित करण्यात आली आहे. रामवाडीतील श्रीदत्तमंदिर ते पारनाक्यावरील  ऐतिहासिक शिवमंदिरापर्यंत ही स्वागतयात्रा असेल. पारंपारिक खेळ आणि वेषभूषा यांचे प्रदर्शन आणि विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक बालकलाकार, महिला, पुरुष यामध्ये पारंपरिक वेषभूषेमध्ये सहभागी होणार आहेत. डहाणू येथील शिवशंभो ढोल पथक यामध्ये सहभागी होणार असल्याचे समितीचे मार्गदर्शन निलेश भानुशे आणि कार्याध्यक्ष कुशल पाटील यांनी सांगितले.

गणेश मंदिर, भाईंदर पश्चिम

भाईंदर पश्चिम येथील ६० फुटी रस्त्यावरील श्री गणेश मंदिर यांच्या वतीने रविवारी सायंकाळी ४.३० वाजता स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. विनायक नगर येथील विनायक मंदिरापासून यात्रेचा आरंभ होणार आहे. संपूर्ण शहरात यात्रा फिरल्यानंतर जे. पी. ठाकूर मार्ग येथील रिद्धी-सिद्धी विनायक मंदिराजवळ यात्रेचा समारोप होणार आहे. सर्वधर्मीयांचा समावेश हे यात्रेचे वैशिष्टय़ आहे. लेझीम पथक, ढोल पथक, चित्ररथ हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

शहीद जवानांना अभिवादन

आदिशक्ती ढोल ताशा पथक, गेट टुगेदर ग्रुप, युवा विकास आघाडी, श्री संत सेवा समिती, ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्यातर्फे पाडव्याला शहीद जवानांना अभिवादन म्हणून ‘शूर वीर गौरव’ स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. तुळिंज, आचोळे आणि पश्चिमेला चक्रेश्वर तलाव येथून ही शोभायात्रा निघणार असून बहुजन विकास भवन, श्री प्रस्थ, नालासोपारा येथे तिची सांगता होईल.

साहसी प्रात्यक्षिके

मीरा-भाईंदर शिवसेनेनेदेखील स्वागत यात्रेचे आयोजन केले आहे. सकाळी ८ वाजता काशिमीरा नाका येथून यात्रेचा प्रारंभ होणार आहे. पारंपरिक वेशभूषेतील युवक-युवती, इतिहासकालीन शस्त्रांचे साहसी प्रात्यक्षिक हे या यात्रेचे प्रमुख वैशिष्टय़ आहे.