29 March 2020

News Flash

वसई किल्ल्यातील हनुमान मंदिर धोकादायक अवस्थेत

झाडेझुडपे वाढल्याने देवालय कोसळण्याच्या स्थितीत, दुर्गमित्रांकडून चिंता व्यक्त

वसई किल्ला

झाडेझुडपे वाढल्याने देवालय कोसळण्याच्या स्थितीत, दुर्गमित्रांकडून चिंता व्यक्त

वसई किल्ल्यातील भुई दरवाजाजवळ पेशव्यांनी उभारलेले ऐतिहासिक हनुमान मंदिर धोकादायक स्थितीत आहे. प्रवेशद्वाराच्या कमानीवर आणि आतील अर्धगोलाकार बुरुजांवर मोठय़ा प्रमाणात झाडेझुडपे वाढल्याने बुरुजाचा बराचसा भाग हनुमान मंदिरावर कोसळण्याच्या स्थितीत आहे. भुई दरवाजाही धोकादायक अवस्थेत असून त्याच्या मध्यभागात अनेक झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे भुई दरवाजाही कोसळण्याच्या स्थितीत असून या प्रवेशद्वाराचे अस्तित्व कायमचे लयास जाईल, अशी भीती दुर्गमित्र व्यक्त करत आहेत.

वसई किल्ल्याच्या भुई दरवाजाजवळ १७३९च्या जुलै महिन्यात पेशव्यांनी उभारलेले ऐतिहासिक हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराची उभारणी मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील भागात असणाऱ्या रणमंडळात करण्यात आलेली आहे. प्रवेशद्वाराच्या आतील भागात २५ फूट उंचीच्या तटबंदीच्या आतल्या बाजूस दोन अर्धगोलाकार बुरुजांच्या मध्यात हनुमान मंदिर सामावलेले आहे. सध्या प्रवेशद्वारांच्या कमानीवर आणि आतील अर्धगोलाकार बुरुजांवर मोठय़ा प्रामाणावर झाडेझुडपे वाढल्याने लवकरच बुरुजाचा बराचसा भाग हनुमान मंदिरावर कोसळण्याची शक्यता आहे. दुर्गमित्रांमार्फत या धोकादायक बाबीविषयी पुरातत्त्व विभागास अनेकदा आठवण करून दिलेली होती, पण यावर अजूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात न आल्याने इतिहासाचा एक अमूल्य ठेवा कोसळण्याच्या मार्गावर आहे.

बुरुजाच्या बांधकामाचा आणि तटबंदीचा भाग मंदिरावर कोसळल्यास ऐतिहासिक नुकसान आणि प्रसंगी मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता आहे. हा भाग चिंचोळा व निमुळता असल्याने अपघात झाल्यास उपाययोजना राबवणे आणखीनच कठीण आहे. दरवाजाच्या वरील भागात पूर्वी सैनिकांच्या पहाऱ्यासाठी असणाऱ्या जागेत आता दारू बाटल्या आढळत आहेत. जुनी प्रवेशद्वारे माती व लाकडी फळय़ांनी बंदिस्त करण्यात आलेली आहे. मुख्य प्रवेशद्वारात मातीची नव्याने भरणी चालूच आहे. त्यामुळे भुईदरवाजाची प्राथमिक अथवा कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास भुई दरवाजाचे अस्तित्वही लयास जाईल, अशी भीती दुर्गमित्रांना वाटत आहे.

भुई दरवाजाजवळ असलेल्या मोडक्या दरवाजाचे अवशेष पुरातत्त्व विभागाने संवर्धनासाठी नेले होते, पण त्याचे पुढे काय झाले हे अजूनही उमगलेले नाही. मंदिराच्या बांधकामावर योग्य अंकुश न ठेवल्याने मूळ मंदिराचे स्वरूप पार लयास गेलेले आहे. मंदिराच्या मागील भागात बरेच जुने सामान विखुरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे वसईतील प्रामाणिक व संवेदनशील नागरिकांनी गौरवशाली इतिहासाच्या सावल्या जपण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे.  -डॉ. श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2016 1:15 am

Web Title: hanuman temple in vasai fort
Next Stories
1 भाजप नगरसेविकेचे पद धोक्यात
2 सफाई कामगार नव्हे, आरोग्यसेवक म्हणा!
3 तिवरकत्तलीत मोठी वाढ
Just Now!
X