21 September 2020

News Flash

वसई-विरार जलमय

वसई-विरार शहरांत मंगळवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी दिवसभर कोसळत होता.

वसई : वसई-विरार शहरांत मंगळवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारी दिवसभर कोसळत होता. बुधवारी तब्बल १९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नैसर्गिक निचऱ्याच्या ठिकाणी झालेली अनधिकृत बांधकामे तसेच गटारांची सदोष बांधकामे यामुळे शहरातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येत असून शहराच्या विविध भागातील रस्ते आणि परिसर अजूनही जलमय आहेत.

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पूरस्थितीला सामोरे जाणाऱ्या वसई-विरार शहरात यंदा अजूनही पूरस्थिती निर्माण झाली नसली तरी सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आणखी एक-दोन दिवस अविश्रांतपणे सुरू राहिला तर शहराची दैना होईल, असे संकेत मिळू लागले आहेत. बुधवारी वसई-विरारमधील अनेक रस्ते आणि रहिवासी परिसर जलमय झाले असून अजूनही त्या ठिकाणच्या पाण्याचा निचरा झालेला नाही. विशेषत: सागरशेत येथून मूळगावच्या दिशेने जाणारा रस्ता अजूनही पाण्याखालीच आहे. या ठिकाणी आजही स्थानिक तरुण रस्त्यावर उतरून वाहनचालकांना दिशादर्शन करताना दिसले. याशिवाय होळी येथील बाजारातून बंगलीच्या दिशेने जाणारा रस्तादेखील अजूनही पाण्याखाली आहे. या ठिकाणी महापालिकेची यंत्रणा अजिबात फिरकलेली नाही. त्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नालासोपारा येथील तुळींज रोड, विजय नगर, आचोळे, अग्रवाल नगर आणि संतोष भुवन, तर विरार येथील विवा कॉलेज रास्ता, वसईतील माणिकपूर येथील सखल भागातील पाण्याचा अजूनही निचरा झालेला नाही. वसई पूर्वेकडील वसंत नगरी, शारजा मोरी, भाताणे, भोयदापाडा, चांदीप, धानीव बाग, सातिवली येथील पाणीही पूर्णपणे ओसरलेले नाही.

देवतलाव रस्ता पाण्याखाली

वसई पश्चिमेकडील देवतलाव येथील रस्ताही अजूनही पाण्याखाली आहे. या भागात दोन महिन्यांपूर्वीच उघाडीचे काम करण्यात आले होते. मात्र काम सदोष असल्यामुळे ही उघाडीच पाण्याखाली गेल्याचे स्थानिक सांगत आहेत. याशिवाय याच ठिकाणाहून रानगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरही गुडघाभर साचलेले पाणीही तसेच आहे.

‘वसईची जलकोंडी मानवनिर्मित’

वसईच्या पूर्व-पश्चिमेकडे असलेल्या अनेक सोसायटय़ांच्या आवारात शिरलेले पाणीही अद्याप ओसरलेले नाही. सोसायटय़ांच्या आवारात पाणी गेल्याने गाडय़ांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी इमारतीच्या पिण्याच्या टाकीत गेल्याने पाणी दूषित झाले आहे. आता नैसर्गिक नाल्यावर झालेली अनधिकृत बांधकामे झाली आहेत. पाण्याच्या निचऱ्याचे मार्ग बुजविण्यात आले आहेत. वसईची जलकोंडी ही नैसर्गिक कमी आणि मानवनिर्मित जास्त आहे, असे पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वय समीर वर्तक यांनी सांगितले.

पांढरतारा पूल पाण्याखाली

वसई : मुसळधार पावसामुळे  वसई पूर्वेतील तानसा नदीवर असलेला पांढरतारा पूल पाण्याखाली गेला. यामुळे येथील आजूबाजूचे गाव व पाडय़ा वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. वसई पूर्वेतील परिसरात भाताने, नवसई , आडणे, थल्याचापाडा  व इतर २० ते २५ पाडे व वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी तानसा नदीवर पूल तयार करण्यात आला आहे. पुलाची उंची जास्त नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. मागील दोन दिवसांपासून वसईत पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे तानसा नदीचे पात्र ही दुथडी भरून वाहू लागले आहे. या वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे.

पूर परिस्थितीमुळे या पुलावरून वाहतूक व प्रवास पूर्णपणे ठप्प झाला आहे. या आजूबाजूच्या गावासह जवळचा रस्ता म्हणून वज्रेश्वरीच्या दिशेने जाणारे नागरिकही याच मार्गाचा वापर करतात. आता पुलावरच पाणी आल्याने येथील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना १२ ते १५ किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

पुलाची उंची वाढविण्याची मागणी कागदावरच

चार मुख्य गावे व इतर खेडय़ापाडय़ाना जोडणारा पांढरतारा पूल दरवर्षी पावसाळ्यात पाच ते सात वेळा पाण्याखाली जातो. त्यामुळे येथील नागरिकांना प्रवासासाठी विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी या पुलाची उंची वाढविण्याची मागणी येथील नागरिक मागील २० ते २५ वर्षांपासून करीत आहेत. परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.

विजेचा खेळखंडोबा

बुधवारी पहाटेदेखील वसईत तुफान पर्जन्यवृष्टी झाली. त्याचा फटका वीजपुरवठय़ाला बसला. वसई-विरार शहराच्या विविध भागांतील वीज काही तास बेपत्ता झाली, तर पश्चिम पट्टय़ातील गावांमध्ये दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील काही ठिकाणी इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली. त्यामुळे घरून काम करणारे अनेक कर्मचारी त्रस्त झाले.

२४ ठिकाणी झाडे उन्मळून पडली

वसई-विरार शहरांतील २४ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. त्यात नालासोपाऱ्याच्या आचोळे येथे ८, श्रीपस्थ येथे २, विराच्या बोळींज येथे ३, फुलपाडा येथे १, वसईच्या सनसिटी येथे ६ आणि दिवाणमान येथे ४ झाडे पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडे कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

वसईतील पर्जन्यमान

(मिलिमीटरमध्ये)

* मांडवी       १३२

* आगाशी      २०५

* निर्मळ              २३४

* विरार        २१४

* माणिकपूर    १७६

* वसई        २१८

एकूण          १५२८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 3:17 am

Web Title: heavy rain in vasai virar zws 70
Next Stories
1 मीरा-भाईंदरमध्ये सखल भाग पाण्याखाली
2 करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मिशन सुपर ३०’ मोहीम
3 मुंबईसारखी मोकळीक द्या!
Just Now!
X