मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

ठाणे : जिल्ह्य़ात मंगळवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारी सकाळपर्यंत कायम होता. या पावसामुळे लोकल वाहतूक ठप्प झाल्याने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना स्थानकातून पुन्हा माघारी परतावे लागले. तर, काहींनी बसने प्रवासाचा निर्णय घेतल्यामुळे ठाणे ते बदलापूपर्यंतच्या सर्वच बस थांब्यांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र होते.

ठाणे शहराच्या तुलनेत जिल्ह्य़ातील इतर शहरांमध्ये पावसाचा जोर फारसा नव्हता. मात्र, दुपारनंतर सर्वच ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. त्यामुळे कामावरून परतणाऱ्या सर्वाचे पुन्हा हाल झाले. तसेच ठाणे शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा काहीकाळ खंडीत झाला होता. तर काही मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच शहरांमध्ये मंगळवार रात्रीपासून पाऊस सुरू झाला. ठाणे शहराच्या तुलनेत जिल्ह्य़ातील इतर शहरांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होता. बुधवार सकाळपर्यंत हा पाऊस सुरूच होता. त्यामुळे ठाणे शहरातील नौपाडा येथील भास्कर कॉलनी, कळवा येथील स्थानक परिसर, कळवा प्रभाग समिती कार्यालयासमोर, वंदना सिनेमा, कोपरी येथील जगदाळे वाडी, चेंदणी कोळीवाडा, सिद्धार्थनगर, माजीवडा, कापूरबावडी परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. भास्कर कॉलनी, चेंदणी कोळीवाडा भागात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते.

मुंब्रा आणि कोपरी भागात भिंत पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. सतत सुरू असलेला पाऊस आणि रस्त्यावर खड्डे यांमुळे मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनचालकांना १० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होता.

भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये मंगळवारी रात्री पावसाचा जोर फारसा नव्हता. परंतु बुधवारी दुपारी या सर्वच शहरांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र होते. भिवंडी शहरातील धामणकरनाका, मंडई परिसर, नदीनाका येथील सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे परिसराती बैठी घरे आणि दुकानांमध्येही पाणी गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरात बुधवारी पावसाचा जोर वाढला होता.

तीन हात नाका कोंडीत

ठाणे येथील तीन हात नाका परिसर वाहतूकीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा मानला जातो. येथून नितीन कंपनीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मेटो प्रकल्पाचे काम सुरू आहे. या भागात पावसाचे पाणी साचल्याने तीन हात नाकाहून नितीन कंपनीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याचे चित्र होते.