सखल भागांत पाणी, शेतीचेही नुकसान, वीजपुरवठा दर तासाला खंडित

मंगळवारी वसईत मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावली. मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सायंकाळपर्यंत सुरू होती. त्यामुळे वसई-विरारमधील अनेक सखल भागांत पाणी साचले तर शेतीचेदेखील यामुळे नुकसान झाले.

मुसळधार पावसाच्या शिडकाव्याने परतीचा पाऊस वसईत मंगळवारी बरसला. वादळी वारे व विजेच्या मारा यामुळे वसईत वीजपुरवठा दर एक तासाला खंडित होत होता, तर वसई, नालासोपारा आणि विरारमधील काही सखल भागांत सततच्या पावसामुळे पाणी साचले होते. नालासोपारा येथील संतोष भुवन या सखोल भागात नेहमीच्या पावसामुळे पाणी साचले या वेळीदेखील पाणी साचल्याने येथील नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. वसई सागर शेत रस्त्यावरदेखील पाणी साचले होते. वालीव येथील औद्योगिक वसाहतीकडे जाणारा रास्ता, गोलानी या ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना त्याचा फटका बसला. वादळी वारा त्यात पावसाचा मारा यामुळे वसई-विरारमध्ये एका दिवसात सहा ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. नालासोपारा येथील संतोष भुवन, बंगली, भुईगाव, निर्मळ होली क्रॉस येथे एक तर निर्मळ येथे दुसरे झाड पडले होते आणि पेल्हार अशा सहा ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असल्याचे पालिका अग्निशमन दलाचे पालव यांनी सांगितले.

मच्छीमारांना धोक्याचा इशारा

पालघर जिल्ह्यातील सर्व मच्छीमारांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या असून सागर रक्षक दल, ग्राम रक्षक दल, याना सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. येत्या २४ तासांत कोकण किनारपट्टी भागात पश्चिमेकडून दक्षिणेकडे वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. समुद्र हवामान खराब असलेने मच्छीमार बांधवांना मच्छीमारीकरिता समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्र, खाडीकिनाऱ्यावरील नागरिकांना काही आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित पोलीस स्थानक, नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालघर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी केले आहे.

शेतकरीवर्ग चिंताग्रस्त

तीन दिवस आधी पडलेल्या पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यातच मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे भातशेतीची रोपे आडवी झाली, तर शेतात पाणी साचल्याने पश्चिम किनारपट्टीवरील पिकवलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. हे नुकसान अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच चवळी, शिराळे, गवार, वाल यासह अन्य भाज्यांच्या लागवडीला या वेळी सुरुवात होते; परंतु यासाठी अजून काही दिवस थांबावे लागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

झाड कोसळले

अतिवृष्टीमुळे वसईच्या विविध भागांत झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. बंगली येथील कार्डिनल ग्रेशस रुग्णालयाच्या आवारातील मोठे झाड कोसळले. खाली उभ्या असलेल्या मोटारसायकलींवर झाड पडल्याने मोटारसायकलींचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आवारातच उपाहारगृह आहे, मात्र झाड उपाहारगृहावर न पडल्याने दुर्घटना टळल्याचे अग्निशमन दलप्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले. दरम्यान, निर्मळ, भुईगाव, पेल्हार येथेही झाडे कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.