मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांकडून तक्रारीचा सूर

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात टाळेबंदीनंतर वीज देयके दुप्पट पाठवण्यात येत आहेत. या वाढीव देयकांमुळे वीज ग्राहक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट असताना ती भरायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आल्यामुळे टाळेबंदीचा नियम लागू करण्यात आला होता. या परिस्थितीत वीज कंपन्यांकडून मीटर रीडिंग न घेता सरासरी वापराप्रमाणे वीज देयके पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता पाठवण्यात आलेली देयके ही सरासरी वापरापेक्षा दुप्पट आल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. अधिक रक्कम वसूल करून या वीजकंपन्या आपले आर्थिक नुकसान भरून काढत असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.

एका महिन्यापूर्वी बंद औद्योगिक वसाहतींना हजारो रुपयांची देयके पाठवण्यात आली असल्याचे समोर आले होते. ते प्रकरण चांगलेच तापले असल्यामुळे पुन्हा रीडिंग तपासूनच देयके पाठवण्याचा निर्णय या वीजकंपनीकडून घेण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा गृहसंकुलात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या सरासरी वापरापेक्षा दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक देयके पाठवण्यात आली असल्यामुळे या विषयी नागरिकांनी लेखी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वीज कंपनीकडून योग्य उत्तर न मिळाल्यास देयक न भरण्याचा निर्णय नागरिकांडून घेण्यात आहे.

माझे प्रति महिना बिल हे ८०० ते ९०० रुपये येते. मागील सर्व बिले मी वेळेवर भरत आलो आहे. उन्हाळा असल्याचे लक्षात घेता माझे बिल जास्तीत जास्त १२०० रुपये येऊ  शकले असते. परंतु आता मला रीडिंग न घेता पाठवण्यात आलेले बिलं हे  २१०० रुपये आहे. त्याच प्रकारे आमच्या गृहसंकुलातील अनेक नागरिकांना अधिक देयके देण्यात आली आहेत. त्यामुळे या विषयी मी तक्रार करत आहे.

– भरत टेलर, वीज ग्राहक, मीरा-भाईंदर