अग्निशमन परवाना दंडात सूट; सील केलेले हॉटेल खुले करणार

अग्निशमन परवाने मिळवण्यासाठी महापालिकेने घातलेल्या अटी जाचक असल्याचा आरोप करत मंगळवारी दुपारपासून संपावर गेलेल्या ठाण्यातील बार तसेच हॉटेलमालकांनी बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आपला बंद मागे घेतला. अग्निशमन परवाना मिळवण्यासाठी महापालिकेने आकारलेल्या दंडात सूट देण्यासोबत आधी कारवाई करण्यात आलेले हॉटेल पुन्हा खुले करून देण्याचे आश्वासन देत महापालिका प्रशासनाने हॉटेल व्यावसायिकांपुढे माघार घेतली. मात्र, यापुढे अग्निसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जाणार का, याविषयी कोणतीही स्पष्टता नसल्याने पालिकेच्या मवाळ भूमिकेवर वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे.

कमला मिल कम्पाऊंड आग दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेनेही आपल्या हद्दीतील हॉटेल व इतर आस्थापनांविरोधात कारवाई सुरू केली होती. अग्निशमन दलाचा ना-हरकत दाखला नसलेल्या  ४२६ हॉटेल्स, बार, लाऊं ज यांना यापूर्वी महापालिकेने नोटीसा बजाविल्या होत्या. यापैकी ८२ अस्थापनांनी नियमांची पूतर्ता करत असे दाखले मिळवले. याशिवाय २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्यासाठी दाखल करण्यात आली आहेत. ही प्रक्रिया एकीकडे सुरू असली तरी काही हॉटेलमालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे महापालिकेने अशा अस्थापनांवर कारवाई सुरू करताच मंगळवारी दुपारपासून शहरातील हॉटेलमालांनी बंद पुकारला होता. अग्निशमन परवाना मिळविण्यासाठी टाकण्यात आलेल्या जाचक अटी तसेच दंड आकारणी अधिक असल्याचा मुद्दाही या बंददरम्यान मांडण्यात आला होता. हा संप मागे घ्यावा आणि चर्चेसाठी पुढे यावे असे आवाहन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी केले होते. त्यानुसार बुधवारी महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात आयुक्त आणि हॉटेल, बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत आयुक्तांनी प्रशासकीय कर आकारणी कमी करण्याचे तसेच दंड आकारणीत सुलभ हप्ते करून देण्याचे आश्वासन संबंधितांना दिले. तसेच ज्या बारना सील ठोकण्यात आले आहे तेथील व्यवस्थापनांना अग्निशमन परवाना घेण्यासाठी मुदत दिली जाईल, असे आश्वासनही या बैठकीत देण्यात आले आहे, अशी माहिती बार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीनंतर बार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बार असोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी दिली. दरम्यान, बारमालकांना आकारण्यात आलेल्या दंडाचा भरणा करण्यासाठी त्यांना हप्ते करून देण्यात येणार असून प्रशासकीय कर आकारणी कमी करण्यासंबंधी विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली.

क्षेत्रफळानुसार कर आकारणी?

यापूर्वी थेट २० ते २५  लाखांपासून कर भरणा करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. अशी वसुली केवळ ठाणे महापालिका हद्दीतच केली जाते, असा मुद्दा बारमालकांनी मांडला होता. नव्या रचनेत ५०० चौरस फुटांपर्यंत २५ हजार, ५०० ते दोन हजार चौरस फुटांपर्यंत एक लाख आणि त्यापुढे पाच लाखांचे टप्पे तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

नौपाडावासीयांचे तिहेरी हाल

एकीकडे अग्निशमन दलाच्या नियमांच्या विरोधात बार आणि हॉटेलचालकांनी मंगळवारी बंद पुकारला तर दुसरीकडे स्टेम प्राधिकरणाने पाणीपुरवठा बंद ठेवल्याने नौपाडा, घोडबंदरसारख्या प्रमुख भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तसेच येथील नौपाडा भागात दुरुस्तीच्या कामासाठी पाइप गॅसपुरवठाही काही तास बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. हा परिसर ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कार्यालये, मोठे व्यापारी आणि दुकाने स्थित आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रीही मोठय़ा प्रमाणात होते. मात्र हॉटेलचालकांचा बंद, गॅस आणि पाणी नसल्याने येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवल्याचे चित्र बुधवारी दिसून आले.