वसई-विरारमध्ये पाणी वितरणाची व्यवस्था धिम्या गतीने

वसई-विरार महापालिकेने नवीन नळजोडण्या देण्याचे काम सुरू केले असले तरी वितरण व्यवस्था पूर्ण न झाल्याने हजारो गृहनिर्माण संस्थांना नळजोडण्या मिळालेल्या नाहीत. दुसरीकडे नळजोडणी प्रक्रिया अद्यापही ऑनलाइन न झाल्याने या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

वसई-विरार शहरात सूर्या पाणी प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक ३ मधून अतिरिक्त शंभ दशलक्ष लिटर पाणी आले आहे. यापूर्वी उसगाव, पेल्हार आणि सूर्या धरणांतून १३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. सूर्याचे अतिरिक्त शंभर दशलक्ष लिटर पाणी आल्याने शहरात मुबलक पाणी आलेले आहे. पालिकेने नवीन नळजोडण्या देण्यास सुरुवात केली आहे. मात्र वितरण व्यवस्था पूर्ण न झाल्याने हे पाणी हजारो गृहनिर्माण संस्थांना पोहोचलेले नाही. अद्यापही अडीच हजारांहून अधिक नळजोडणीचे अर्ज महापालिकेत पडून आहेत. यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. पालिका हेतुपुरस्सर नळजोडण्या देण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

सूर्या टप्पा क्रमांक तीनची योजना ३०० रुपये कोटींची होती. त्यातून शहराला पाणी मिळाले, परंतु वितरण व्यवस्था तयार करण्याचे काम सुरू असल्याने सर्वांपर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे नळजोडण्या देण्यास दिरंगाई होत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. अमृत योजनेअंतर्गत १४० कोटी रुपये खर्चून जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारण्याचे काम सुरू असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या भागात जलवाहिन्या नाहीत, त्या भागात नवीन नळजोडण्या सध्या दिल्या जात नाही. जलवाहिन्यांचे काम पूर्ण होताच, त्या भागातील नागरिकांना नवीन नळजोडण्या दिल्या जातील, असे पालिकेने स्पष्ट केले.

प्रक्रिया ऑनलाइन नाही

महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यासापासून इतर सर्व सुविधा ऑनलाइन आहेत. मात्र नळजोडणीची प्रक्रिया अद्याप ऑनलाइन करण्यात आलेली नाही.

‘मागेल त्याल नळजोडणी मिळणार’

नागरिकांना नळजोडणी मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोपाचा वसई-विरारचे महापौर रूपेश जाधव यांनी इन्कार केला आहे. अनेक अडचणींचा सामना करत विक्रमी वेळेत सूर्या योजनेचा तिसरा टप्पा मंजर करून घेतला. आता वितरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वाना नळजोडणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नळजोडणीसाठी कुणालाही महापालिकेच्रूा पावतीतील रकमेव्यतिरिक्त एक रुपयाही देऊ  नये, असे आवाहन केले आहे. राजकीय हस्तक्षेपाचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. नळजोडणीसाठी कुठल्या नगरसेवक किंवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे एकतरी पत्र दाखवा, असे ते म्हणाले. शहरातील जो करदाता नागरिक आहे, त्या प्रत्येकाला नळजोडणी देऊ , असे ते म्हणाले.

पाणी आक्रोश परिषद

पाणी प्रश्नावर वसईतील नागरिक संतप्त असून याबाबत भाजपने महापालिकेला जाब विचारण्याचे ठरवले आहे. त्यासाठी रविवारी वसईत पाणी परिषद घेण्यात येणार आहे. नळजोडणीचे प्रलंबित हजारो अर्ज, नळजोडणीतील भेदभाव, सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप, शहरातील हजारो अनधिकृत नळजोडण्या, टँकरचे वाढलेले प्रमाण यावर या परिषदेत पालिकेला धारेवर धरले जाणार आहे. पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार राजेंद्र गावीत या परिषदेत उपस्थित राहणार आहेत.

अनधिकृत इमारतींचा प्रश्न कायम

वसई-विरार शहरात हजारो अनधिकृत इमारती आहेत. त्या इमारतींच्या रहिवाशांना नळजोडणी द्यावी अथवा नाही, याचा निर्णय झालेला नाही. सत्ताधाऱ्यांनी अनधिकृत इमारतीं आणि चाळींना नळजोडण्या दिल्या जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. महासभेत हा विषय मंजुरीसाठी आणण्यात आला नाही.