पालिका, जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभाग अंधारात;  सातव्या मजल्यापर्यंत बांधकाम

डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाण पाडा येथील खाडीकिनारी भूमाफियांनी महिनाभरापासून खाडीपात्रालगत सहा ते सात मजली इमारतीचे बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग या बेकायदा बांधकामाबद्दल अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.

कुंभारखाण पाडाच्या खाडीकिनारच्या स्मशानभूमीजवळ आणि खाडीपात्रापासून काही अंतरावर या बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू आहे. अतिशय दलदलीच्या ठिकाणी ही इमारत असल्याने राडारोडा टाकून या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते तयार करण्यात आले आहेत. बांधकामासाठी, इमारतीला पाणी मारण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता खाडीतून पाणी उचलण्यात आले आहे. पाण्याचा मुबलक वापर करता यावा यासाठी बांधकामाजवळ दोन प्लास्टिक टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. महसूल विभागाच्या अकृषिक परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. विकास अधिभार, मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून लाखो रुपयांचे पालिका, महसूल विभागाचे नुकसान करून हे बांधकाम सुरू आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

आजवर कुंभारखाण पाडा, राजूनगर, शिवाजीनगर खाडीकिनारा परिसर बेकायदा चाळी, इमारतींपासून मुक्त होता. आता माफियांनी या भागात झटपट पैसे कमावण्यासाठी बस्तान बसविण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.

पालिका, महसूल विभागाकडून या भागातील बांधकामांवर कारवाई होत नसल्याने एका जागरूक नागरिकाने मुख्यमंत्री, नगरविकास प्रधान सचिवांना या बेकायदा बांधकामाची तक्रार केली आहे.

हरितपट्टय़ावर अतिक्रमण

कुंभारखाण पाडा खाडीकिनारी निवासी, हरित पट्टय़ाची आरक्षणे आहेत. बेकायदा इमारत सुरू असलेले बांधकाम निवासी क्षेत्रात उभारण्यात येत आहे. विकासकाने पालिकेच्या कोणत्याही प्रकारच्या परवानग्या घेतलेल्या नाहीत. त्यामुळे हे बांधकाम पूर्णत: बेकायदा आहे, अशी माहिती पालिकेच्या नगररचना विभागातील एक विश्वसनीय सूत्राने दिली. कल्याणचे प्रांत अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी या कामाची माहिती घेऊन पर्यावरणविषयक नियमांचे संबंधिताकडून उल्लंघन झाले असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.