धोकादायक इमारतीतून ‘रेंटल’मध्ये स्थलांतरित झालेल्यांची भावना 

अतिधोकादायक इमारत असल्याचे सांगत त्यांना ऑगस्ट २०१५ च्या पावसाळ्यात तडकाफडकी बाहेर काढण्यात आले. भविष्यात हक्काचे घर मिळेल की नाही या विवंचनेतच ‘हरिनिवास’ सर्कलजवळच्या आजीकृपा इमारतीतील ५७ कुटुंबांनी इमारत सोडली. पण महापालिकेने त्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिलेल्या घरांमध्ये प्रवेश केल्यानंतर ‘आगीतून फुफाटय़ात’ आल्याची भावना या नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. पाणीटंचाई, विजेचा खेळखंडोबा, अस्वच्छता अशा एकनानेक समस्यांना तोंड देणाऱ्या रहिवाशांच्या पुढे ‘आता जगायचं कसं?’ असा प्रश्न आ वासून उभा आहे.

पालिकेने अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्यानंतर जवळपास ४५ वर्षे वास्तव्य केलेल्या इमारतीला या कुटुंबांनी कायमचा निरोप दिला. एका दिवसातच बाहेर पडावे लागल्याने हातात मिळेल ते सामान आणि महत्त्वाची कागदपत्रे घेऊन ही बिऱ्हाडे बाहेर पडली. मालकाने तातडीने बाहेर काढून घराला तात्पुरती कुलपे लावली असल्याने अनेकांचे सामान त्या वेळी चोरीला गेले. पर्यायी जागाच उपलब्ध करून दिली नसल्याने बेघर झालेली ही कुटुंब कुठे दहा हजार तर कुठे पंधरा हजार एवढे भाडे देऊन राहत होती. काही नागरिकांनी महापालिकेच्या रेंटल हाऊसिंगची दारे ठोठावली. त्यामुळे मार्च २०१६ मध्ये नौपाडा, महागिरी, वर्तकनगर, सहयोग मंदिर, रामवाडी या ठिकाणच्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांची महापालिकेने नौपाडा परिसरात सतरा मजली इमारतीत दोन हजार रुपये भाडेतत्त्वावर राहण्याची सोय केली. मात्र विजेचा लपंडाव, पाण्याची वानवा, सातत्याने बंद पडणारी उद्वाहन व्यवस्था, सुरक्षारक्षक आणि स्वच्छतादूत नाहीत, अशा अवस्थेमुळे रहिवाशांचा भ्रमनिरास झाला. आगीतून फोफाटय़ात पडल्याचा अनुभव त्यांच्या पदरी आला.

पिण्याचे पाणी सुरुवातीचे चार-पाच दिवसांनी यायचे. रहिवाशांनी वारंवार महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर सध्या या इमारतीत दोन दिवसांनी पिण्याचे पाणी उपलब्ध होते, असे इथे राहणाऱ्या  डी. के. कदम यांनी सांगितले. या इमारतीतील रहिवाशांपैकी कुणी धुणीभांडी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याने महिन्याला दोन हजार एवढे भाडे देणेही काहींना शक्य नाही. सध्या या इमारतीत ११५ कुटुंबे राहत असून वृद्ध नागरिक मोठय़ा संख्येने राहतात. हक्काचे घर मिळेल या अपेक्षेने आम्ही जगतोय तर काहींनी या उपेक्षेतच आपले प्राण सोडले, हे सांगताना या इमारतीतील वृद्ध महिलांचे डोळे पाणावतात. इमारत दुरुस्ती करण्यासारखी होती. आमच्या पैशांनी आम्ही ती दुरुस्त करण्यासाठी विनवण्याही केल्या. मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही, असे सांगत आमच्या परिस्थितीला महापालिका प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिकच जबाबदार असल्याचा आरोप येथील रहिवासी करतात.

काही इमारतींचे दोन मालक असून भाडेकरूंना पुनर्विकासात घर देण्याबाबत त्यांच्यात मतभेद आहेत. काही मालकांनी भाडेकरूंना घरे देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत या तात्पुरत्या घरात किती काळ राहावे लागणार, असा प्रश्न या रहिवाशांना पडला आहे.