कल्याण-डोंबिवलीत अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली पालिकेतील अतिक्रमण नियंत्रण विभागातील अधिकारी, प्रभाग अधिकारी निवडणूक कामात व्यस्त झाल्याने भूमाफियांनी शहरात बेकायदा बांधकामे सुरू केली आहेत. कुंभारखाणपाडा, देवीचा पाडा, गरिबाचा पाडा, आयरे, विष्णूनगर, २७ गाव, कल्याण पूर्वेतील काटेमानिवली, कोळसेवाडी, टिटवाळा, मांडा भागात ही बांधकामे सुरू आहेत.

डोंबिवली पश्चिमेत गरिबाचा पाडा अनमोल नगरीच्या प्रवेशद्वारावर (कांचनगंगा इमारतीसमोर व शंकर मंदिराजवळ) बगिचासाठी आरक्षित असलेल्या राखीव भूखंडावर गेल्या दोन महिन्यांपूर्वी माफियांनी बेकायदा बांधकाम सुरू केले होते. ‘लोकसत्ता’ने वृत्त दिल्यानंतर उपायुक्त सुनील जोशी, ह प्रभाग अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांनी ते बांधकाम थांबविण्याचे लेखी आदेश भूमाफियांना दिले होते. त्यामुळे महिनाभर ते काम थांबले होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच ते थांबविण्यात आलेले काम पुन्हा नव्या जोमाने सुरू केले आहे. या कामाचा पहिला मजला पूर्ण होऊन दुसऱ्या मजल्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. डोंबिवली पश्चिमेतील कोपर क्रॉस रस्त्यावरील शिवसेना शाखेजवळ न्यू पुष्कराज सोसायटी आहे. या सोसायटीजवळ अनेक वर्षे रिकाम्या असलेल्या भूखंडावर एका दोन मजल्याची बेकायदा इमारत उभी केली आहे. हे बांधकाम सुरू असताना या सोसायटीतील रहिवाशांनी पालिकेला जागृत केले, पण त्याची दखल घेतली नाही. मुखारी पवार यांनी बांधलेली ही बेकायदा इमारत पालिकेने अनधिकृत म्हणून घोषित केली आहे. ऑगस्टमध्ये उपायुक्त सुनील जोशी यांनी या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश ह प्रभाग अधिकारी कंखरे यांना दिले होते, पण पुढे काही कार्यवाही झाली नाही. आता या इमारतीत चार भाडेकरू राहत आहेत.

विविध ठिकाणी सद्य:स्थितीत २५० हून अधिक बेकायदा इमारती, चाळींची बांधकामे शहरात सुरू आहेत. पालिका आयुक्त गोविंद बोडके, उपायुक्त सुनील जोशी या बेकायदा बांधकामांच्या विषयावर आक्रमक होत नसल्याने शहरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पालिकेच्या परवानग्या न घेता सुरू असलेल्या बांधकामांना नोटिसा पाठवून थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही ती बांधकामे पुन्हा सुरू असतील तर जमीनदोस्त करण्याची कार्यवाही केली जाईल. -ज्ञानेश्वर कंखरे, ह प्रभाग अधिकारीडोंबिवली पश्चिम