अंबरनाथच्या हद्दीत असला तरी आयुध निर्माणी कारखाना परिसरातील दिवाबत्ती, रस्ते, गटारे आणि पायवाटांच्या समस्या कायम आहेत.  या समस्यांचे स्थानिक प्रशासनाशी आजही देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. तरीही या वेळी काहीतरी चमत्कार होईल आणि समस्या सुटतील या आशेने येथील रहिवाशी मतदान करणार आहेत.  या निवडणुकीत प्रभाग क्र. १७ आणि १८ मध्ये आयुध निर्माण वसाहतीचा समावेश करण्यात आला आहे. कोहोजगांव, सिद्धार्थनगर, वांद्रेपाडा, न्यू कॉलनी डीएमसी चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड वसाहत, विम्को चाळ, खुंटवली पाडा, नवीन भेंडीपाडा आदी पश्चिमेकडील वसाहतींबरोबरच पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसर, कानसई, हाल्याचा पाडा आदी विभागांत अनेक मातब्बर नेत्यांचे भवितव्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे पणाला लागले आहे.
या बहुभाषिक पट्टय़ात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र त्या मतांचे धुव्रीकरण करण्यास समविचारी पक्ष नेहमीच अयशस्वी ठरतात. गेल्या दोन निवडणुका काँग्रेसच्या हात चिन्हावर निवडणुका लढविणाऱ्या रिपाइंच्या (सेक्युलर) नेत्यांनी यंदा राष्ट्रवादीच्या घडय़ाळाला पसंती दिली आहे. त्यामुळे काँग्रेस एकाकी लढत देत आहे. निवडणुकीआधीच प्रभाग क्र. १६ मधून काँग्रेसचे उमेश पाटील बिनविरोध निवडले गेले आहेत. निवडणुकीआधीच मिळालेला हा शुभशकुन समजून काँग्रेसने शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपली उरलीसुरली सारी ताकद पणाला लावली आहे. प्रदीप पाटील स्वत: प्रभाग क्र. २० मधून निवडणूक लढवीत आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे शहरातील ज्येष्ठ नेते यशवंत जोशी यांचे बंधू विलास जोशी प्रभाग क्र. २३ मधून निवडणूक रिंगणात आहेत. शहरातील शिवसेनेतील एक बडे प्रस्थ मानले जाणारे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख प्रभाग क्र. २१ मध्ये उभे आहेत.  पूर्व विभाग स्थानक -शिवदर्शन परिसरातून ( प्रभाग क्र. ३३) सूर्योदय सोसायटीच्या विद्यमान अध्यक्षा शोभा शेट्टी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवीत असून त्यांचा सामना शिवसेनेच्या शशिकला दोरुगडे आणि राष्ट्रवादीच्या ममता गोखले यांच्याशी होत आहे.
मावळते नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे निवासस्थान याच प्रभागात असल्याने सेनेच्या दृष्टीने ही जागा प्रतिष्ठेची आहे. प्रभाग क्र. ३४ हाल्याचा पाडा विभागातून माजी नगराध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या गुलाब करंजुले यांचा मुलगा अभिजित करंजुले निवडणूक रिंगणात आहे. त्यांचा सामना गणेश कोतेकरांशी आहे. शहरातील लक्षवेधी लढतींपैकी ही एक आहे.    

अंबरनाथमधील प्रभागनिहाय लढती
प्रभाग क्र. १६. कोहोजगांव-सर्वसाधारण (उमेश पाटील-काँग्रेस बिनविरोध)
प्रभाग क्र. १७.आयुध निर्माणी कारखाना-सेंट्रल स्कूल परिसर- प्रकाश डावरे (शिवसेना), भरत पाटील (भाजप), श्वेता लेनीन सुक्कू (काँग्रेस).
प्रभाग क्र. १८.  सिद्धार्थनगर-आयुध निर्माणी कारखाना मंडई विभाग. छाया दिवेकर (शिवसेना), स्नेहल पाखरे (राष्ट्रवादी), गुलाब बनसोडे (काँग्रेस), राणी चव्हाण (भाजप).
प्रभाग क्र. १९.  वांद्रेपाडा- दीपा गायकवाड (भाजप), सविता भोईर (शिवसेना), कमल जमदरे (काँग्रेस), नंदा पाटील (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. २०.  शास्त्रीनगर. प्रदीप पाटील (काँग्रेस), परशुराम जाधव (शिवसेना), सुदेश जाधव (भाजप).
प्रभाग क्र. २१. न्यू कॉलनी डीएमसी चाळ. पाडुरंग खराडे (राष्ट्रवादी). मिलिंद पाटील (काँग्रेस), फातिमा शेख (मनसे), अब्दुल शेख (शिवसेना). सलीम सैय्यद (भाजप).
प्रभाग क्र. २२  महाराष्ट्र हौसिंग बोर्ड. शिवकुमार अन्नामल (काँग्रेस). ख्वाजा चौधरी (राष्ट्रवादी), समीर पवार (मनसे), जुबेर शाह (शिवसेना), सुनील सोनी (भाजप).
प्रभाग क्र. २३.  न्यू कॉलनी विम्को चाळ. विलास जोशी (काँग्रेस), बिस्मिल्ला शेख (भाजप), मोहोम्मद शेख (मनसे), हसीना शेख (शिवसेना), जुलेखा सैय्यद (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. २४.  खुंटवली पाडा. लाजवंती जाधव (भाजप), संदीप भराडे (शिवसेना), सुनीता कांबळे (काँग्रेस).
प्रभाग क्र. २५. घाडगेनगर. लता जावीर (शिवसेना), ज्योती माने (राष्ट्रवादी), सारिका मोरे (कमळ), राजश्री सांगोलीकर (काँग्रेस).
प्रभाग क्र. २६. नवीन भेंडीपाडा. जयश्री गायकवाड (शिवसेना), प्रभावती काकडे (भाजप), रेश्मा सुर्वे (राष्ट्रवादी).
प्रभाग क्र. २७. मोरीवली गांव- नेताजी मार्केट. सुवर्णा भागवत (शिवसेना), वैशाली थेटे (भाजप). मेहरूनिस्सा कुरेशी (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. २८. शिवनगर. डॉमनिक फर्नाडिस (शिवसेना), एडसनमुद्दीन खान (मनसे), बाबू बोसके (भाजप), उमर इंजिनियर (राष्ट्रवादी.)
प्रभाग क्र. २९. कैलासनगर-भाटवाडी. शरीफा शेख (शिवसेना), प्रिसिल्ल डिसिल्व्हा (राष्ट्रवादी). अनिता प्रजापती (काँग्रेस).
प्रभाग क्र. ३०. स्वामीनगर-गांधीनगर. व्ही. रामन वैती (भाजप), अब्दुल शेख (शिवसेना), पी. ग्रेसी सिद्धार्थन (राष्ट्रवादी.)
प्रभाग क्र. ३१. वडोलगांव-जुना भेंडीपाडा. आनंद कन्नक कुप्पन (राष्ट्रवादी), गणेश म्हात्रे (भाजप), याकूब सैय्यद (शिवसेना), सुभाष थोरात (काँग्रेस).
प्रभाग क्र. ३२. कानसई विभाग-सूर्योदय सोसायटी. ज्योत्स्ना भोईर (शिवसेना), संगीता भोईर (मनसे), अश्विनी नेहेते (राष्ट्रवादी), रूपाली खडके (भाजप).
प्रभाग क्र. ३३. स्थानक परिसर- शिवदर्शन परिसर. शशिकला दारूगडे (शिवसेना), शोभा शेट्टी (काँग्रेस), मंजू धल (भाजप), ममता गोखले (राष्ट्रवादी)
प्रभाग क्र. ३४. हाल्याचा पाडा-झोपडपट्टी विभाग. गणेश कोतेकर (भाजप), अभिजित करंजुले (राष्ट्रवादी). सचिन खेरडकर (मनसे). रोहित महाडिक (शिवसेना).
प्रभाग क्र. ३५. पाठारे पार्क-नीलयोगनगर.  स्मिता सकपाळ (शिवसेना), श्यामला मंचेकर (मनसे), मीना मोटे (राष्ट्रवादी). मनी जोसेफ (काँग्रेस).