सकाळी शाळा, दुपारी खासगी शिकवणी आणि मग घरातील पालकांकडून घेण्यात येणारा अभ्यास याशिवाय विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, क्रीडाविषयक शिकवण्यांमुळे विद्यार्थी सतत जखडलेला असतो. त्याला मोकळे वातावरण घरात तर नाहीच; पण शाळेतील शिस्तीमुळे तेथेही मिळत नाही. त्यामुळे अभ्यास, शिकवण्यांमध्ये जखडलेल्या विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणाचा आनंद मिळावा म्हणून विद्यानिकेतन शाळेने महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी शाळेत छंद दिवस (हॉबी डे) साजरा करण्यास सुरुवात केली आहे.शाळेतील या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय दिवस, बालपण अलीकडे दिसत नाही. येऊन जाऊन अभ्यास, शिकवण्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या पायाखाली माती असते, गवत असते; याचीही जाणीव राहिलेली नाही. त्यांना त्यांचे बालपण नीटपणे जगता यावे, या उद्देशाने शाळा व्यवस्थापनाने हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
असा असेल छंद दिवस
छंद दिवस असेल त्या दिवशी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी शाळेत येताना दप्तर आणायचे नाही. फक्त भोजन आणि पाण्याची बाटली सोबतीला ठेवायची. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात गेले पाहिजे असे नाही. शाळेत आलेला प्रत्येक विद्यार्थ्यांला जे वाटेल ते त्याने करायचे. या दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे लक्ष द्यायचे नाही. अभ्यासाचा ‘ब्र’ काढायचा नाही. विद्यार्थी सांगतील त्याप्रमाणे शिक्षकांनीही वागायचे. काही विद्यार्थी क्रिकेट खेळतात, फुटबॉल, काही विद्यार्थी गवत काढतात. तर काही झाडांना पाणी घालण्याचे काम करतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या हातावर मेंदी काढण्याचा मोह होतो; ती इच्छा पूर्ण केली जाते. काही जण वर्गात जमिनीवर झोपतात. काही ग्रंथालयात जाऊन वाचन करतात. अनेकांना शिक्षकांबरोबर पत्ते खेळण्याची इच्छा होते. ती हौस भागवली जाते. शाळेत दोन लॅब्रॉडर जातीचे कुत्रे आहेत. विद्यार्थी या कुत्र्यांबरोबर मैदानात धम्माल मस्ती शाळेच्या आवारात करतात. या सगळ्या मौज-मजेत शाळेचे संस्थापक विवेक पंडित, संचालक अतुल पंडित, शाळेचे शिक्षक, कर्मचारी सहभागी होतात.शाळेच्या वेळेत केलेल्या या धम्माल मस्तीने विद्यार्थी काही वेळ आपले जखडलेपण विसरतात. दुसऱ्या दिवशीच्या अभ्यासासाठी सज्ज होतात, असा अनुभव येत आहे. सध्या या छंद दिवसात पाचवी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी असतात. इयत्ता नववीचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा विचार आहे, असे विवेक पंडित यांनी सांगितले.